पोप फ्रान्सिस यांची घोषणा : जगभरातील 21 सदस्यांमध्ये समावेश
प्रतिनिधी /पणजी
जगभरातील 21 आर्चबिशपना कार्डिनलपदी बढती देण्यात आली असून गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यात ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी रविवारी सेंट पिटर्स चौकात झालेल्या कार्यक्रमात सर्व कार्डिनल्सच्या नावांची घोषणा केली. येत्या ऑगस्ट महिन्यात 27 रोजी व्हॅटिकन सिटीत होणाऱया ’कंसिस्टरी’ सोहळ्यात त्या सर्वांना ’लाल टोपी’ ने आभूषित करून पदभार सोपविण्यात येणार आहे. नवीन कार्डिनल्सना पदभार सोपविण्याच्या सोहळ्यास ’कंसिस्टरी’ म्हणून ओळखण्यात येते.
निवड झालेल्या 21 सदस्यांमध्ये भारतीतील दोन आर्चबिशपांचा समावेश असून आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव (गोवा) आणि आर्चबिशप अँथनी पूला (हैदराबाद) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सदस्यांमध्ये मंगोलिया, घाना, नायजेरिया, सिंगापूर, पूर्व तिमोर, पॅराग्वे, ब्राझील, फ्रान्स, पॅलिफोर्निया येथील आर्चबिशपांचा समावेश आहे. अन्य तीन सदस्य सध्या वेटिकनमध्येच सेवेत कार्यरत आहेत.
कार्डिनलची ही निवड म्हणजे चर्चसाठी नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पोप फ्रान्सिस यांच्या संकल्पाचा एक भाग असल्याचे मानण्यात येत आहे. त्याद्वारे चर्चला वैश्विक स्वरूप प्राप्त करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
दरम्यान, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांना कार्डिनलपदी बढती मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून त्यासंबंधी केलेल्या ट्विटमधून आर्चबिशप फेर्रांव यांचे अभिनंदन केले आहे.