तरुण भारत

अलगीकरण कक्षापर्यंत पोहोचले राजकारण

कोरोना महामारीच्या काळातही सुरु आहे राजकारण

प्रतिनिधी / कोल्हापूर

राजकीय नेत्यांचे राजकारण हे केवळ निवडणूकांपुरते मर्यादित नसते. तर वेळोवेळी कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम नेत्यांकडून केले जाते. एखाद्या संस्थेत नोकरी लावणे, त्याला व्यवसायासाठी मदत करण्यापासून ते पोलीसांनी अडवलेली गाडी सोडवण्यापर्यंत नेतेगीरीचा प्रवास आहे. राजकारणातील ही कर्तव्ये आणि तत्वे सर्वश्रुत आहेत. पण कोरोना महामारीच्या काळातही प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना पायदळी तुडवत नेते आपली भूमिका चोखपणे निभावताना दिसत आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या कार्यकर्त्यांना अलगीकरण कक्षातून बाहेर काढण्यासाठी जिह्यातील काही नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. अलगीकरणाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शेकडो कार्यकर्त्यांना घरी सोडण्याचे महान कार्य त्यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे जिह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यास त्यामध्ये नवल वाटण्यासारखे काहीच नाही.


कागल येथील एका वसतिगृहातील अलगीकरण (क्वॉरंटाईन) कक्षातून अवघ्या दोन दिवसातच पाच नागरिकांना बाहेर सोडल्याचा प्रकार ‘तरुण भारत’ने उघडकीस आणला. त्यांचे स्वॅब न घेताच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऍम्ब्युलन्समधून रात्री उशीरा कागलमध्ये सोडण्याचा पराक्रम पंचायत समितीमधील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयाने केला. प्रसारमाध्यमातील एका प्रतिनिधीच्या सांगण्यावरुनच त्यांना स्वॅब न घेता सोडल्याचे ‘आरोग्य’च्या वरिष्ठ अधिकाऱयांनी नुकतेच सांगितले. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाकडून याची चौकशी होईल आणि संबंधितांवर कारवाई होईल, असे अपेक्षीत होते. पण हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव आल्यामुळे आणि त्यामध्ये मोठा ‘अर्थ’ दडल्यामुळे प्रशासनाने कारवाईचे धारिष्टय़ दाखवले नसल्याची कागलमध्ये चर्चा आहे. परिणामी त्या अलगीकरण कक्षासह एकूण आरोग्य विभागात अद्यापही सर्व काही अलबेल सुरु आहे.


कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्याबाबत काळे मास्क लावून भाजपच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यसरकारचा निषेधही केला. पण सध्याच्या आणिबाणीसदृष्य कालावधीत एखाद्या मुद्यावरून कितपत राजकारण करायचे, आणि ते योग्य की अयोग्य याचे उत्तर जनतेच्या मनामध्ये दडले आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असो, अडचणीच्या काळात सत्ताधाऱयांना कोंडीत पकडण्याचे काम विरोधकांकडून चोखपणे केले जाते. सत्ताधारी आणि विरोधकांचे हे राजकारण वर्षानुवर्षे चालत आले आहे. पण ते कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या मुद्यावर करायचे याचे भान राजकारण्यांना असावे अशी लोकांची माफक अपेक्षा आहे. कागलमधील अलगीकरण कक्षातील नागरिकांना खुलेआमपणे बाहेर सोडून अप्रत्यक्षपणे कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सत्ताधाऱयांसह विरोधी बाकावरील राजकीय मंडळी काय करतात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनमानी कारभाराला चाप लावून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली तरच कोरोनाला जिह्यातून हद्दपार करणे शक्य होईल.


राजकीय हस्तक्षेपातून शेकडो नागरिक अलगीकरण कक्षातून बाहेर


बाहेरील जिह्यातून सुमारे दीड लाख लोक जिह्यात आले आहेत. या सर्वांची प्राथमिक तपासणी आणि स्वॅब घेऊन त्यांचे संस्थात्मक अथवा घरामध्ये अलगीकरण केले जाते. 14 दिवसांच्या या कालावधीत सुरुवातीस आणि दहा दिवसानंतर स्वॅब घेऊन त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना घरी सोडणे आवश्यक आहे. पण राजकीय हस्तक्षेपातून स्वॅब घेण्यापूर्वीच दोन ते तीन दिवसातच शेकडो नागरिकांना अलगीकरण कक्षातून बाहेर सोडले आहे. हे नागरिक सध्या समाजामध्ये वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत ब्रिलियंट स्कुल, नरंदेचे घवघवीत यश

triratna

शाहू समाधी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सव्वा पाच कोटींची गरज

triratna

भुदरगडात सहा जणांना कोरोनाची लागण

triratna

पंचगंगेच्या शुद्धतेबाबत घेतले पाण्याचे नमुने

triratna

वाळूची चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक जप्त

triratna

मुस्लिम बांधवांनो रमजानच्या काळात नमाज घरातच अदा करा

triratna

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More