Tarun Bharat

पोलंडला हरवून अर्जेन्टिना बाद फेरीत

विश्वचषक फुटबॉल : पराभवानंतरही पोलंडची आगेकूच, विजय मिळवूनही मेक्सिको स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था /दोहा

ऍलेक्सिस मॅक ऍलिस्टर व ज्युलियन अल्वारेज यांनी नोंदवलेल्या गोलांच्या बळावर अर्जेन्टिनाने गट क मधील सामन्यात पोलंडचा 2-0 असा पराभव करून गटात  अग्रस्थान मिळविण्यासह अंतिम सोळा संघांतही स्थान मिळविले. अर्जेन्टिनाने या लढतीत सर्वच विभागात पोलंडला आऊटप्ले केले. याच गटातील दुसऱया एका सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियावर 2-1 असा विजय मिळविला. मात्र त्यांना बाद फेरीत स्थान मिळू शकले नाही.

अर्जेन्टिनाने या विजयासह एकूण 6 गुण मिळवित गटात अग्रस्थान मिळविले. त्यांनी दोन विजय मिळविले तर एक सामना गमविला. पोलंडलाही बाद फेरीत स्थान मिळाले आहे. मेक्सिकोइतकेच्या त्यांचेही 4 गुण झाले. पण सरस गोलफरकामुळे पोलंडला पुढील फेरीत स्थान मिळाले.

अर्जेन्टिनाने प्रारंभीच कॉर्नर मिळविला. पण पोलंडच्या बचावफळीने त्यावर त्यांना यश मिळू दिले नाही. पोलंडच्या रॉबर्ट लेवान्डोवस्कीला उजवीकडून क्रॉस पास मिळाला होता व क्रीस्तियन बीलिकने बॉक्सच्या जवळून मारलेला फटका अर्जेन्टिनाकडून ब्लॉक करण्यात आला. पहिल्या दहा मिनिटाला मेस्सीने दोनदा पोलंडच्या गोलच्या दिशेने प्रयत्न केले. पण दोन्ही वेळेस पोलंडचा गोलरक्षक वोसीच स्केसनीने ते थोपविले. पहिल्या गोलसाठी अर्जेन्टिनाने खूप आक्रमक खेळ केला आणि पहिल्या 20 मिनिटाला त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. याशिवाय बॉल पझेशनमध्येही तेच सरस होते. पोलंडही आक्रमण करण्याचा प्रयत्न करीत होते, पण प्रत्येक वेळी अर्जेन्टिनाने त्यांना रोखण्यात यश मिळविले. पहिल्या 30 मिनिटांत खेळात मेस्सी व ऍक्युना यांनी चमकदार प्रदर्शन केले. 32 व्या मिनिटाला अँजेल डी मारियाने पोलंडच्या गोलच्या दिशेने कॉर्नर मारला पण गोलरक्षकाने एका हाताने चेंडू दूर करीत हा प्रयत्न फोल ठरविला. 35 व्या मिनिटाला अल्वारेजच्या क्रॉसवर मेस्सीने हेडरवर फटका मारला. पण तो थोडक्यात हुकला. व्हीएआर रिव्हय़ूनंतर अर्जेन्टिनाला पेनल्टी बहाल करण्यात आली. पण त्यावर गोलरक्षकाने उत्कृष्ट गोलरक्षण केल्याने मेस्सीला गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. या सत्रात अर्जेन्टिनाचा आक्रमक खेळ झाला तर पोलंडने उत्तम बचाव केला.

उत्तरार्धातील सुरुवातीच्या मिनिटालाच मॅक ऍलिस्टरने पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदवत अर्जेन्टिनाला आघाडीवर नेले. यासाठी मोलिनाने त्याला क्रॉस पास पुरविला होता. गोलरक्षकाने स्ट्रेच करीत फटका अडविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी ठरला नाही. 67 व्या मिनिटाला मात्र अल्वारेजने अर्जेन्टिनाची आघाडी दुप्पट केली. फर्नांडेझने अल्वारेजकडे चेंडू पुरविला, त्याने जोरदार फटका लगावल्यानंतर चेंडू जाळय़ात जाऊन विसावला.

मेक्सिको विजयी, तरीही स्पर्धेबाहेर

लुसैल येथे झालेल्या गट क मधील दुसऱया सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियाचा 2-1 असा पराभव केला. मात्र पोलंडइतकेच त्यांचे 4 गुण झाले असले तरी गोलफरक कमी असल्यामुळे मेक्सिकोला बाद फेरीत स्थान मिळू शकले नाही.  उत्तरार्धात हेन्री मार्टिन व लुईस चॅवेज यांनी गोल नोंदवत मेक्सिकोला बाद फेरीच्या शर्यतीत आणले होते. पण सौदीने अनेकदा उत्कृष्ट बचाव केला आणि त्यांचे दोन गोलही नाकारल्याने त्यांना अपेक्षित निकाल साधण्यात यश आले नाही.  त्यांना आगेकूच करण्यासाठी आणखी एका गोलाची किंवा सौदीला गोल करण्यापासून रोखण्याची गरज होती. पण त्यांना यश आले नाही, आणि आगेकूच करण्याची त्यांची संधीही हुकली. सौदीचा स्ट्रायकर सालेम अल दावसरीने स्टॉपेज टाईममध्ये गोल नोंदवला, तो मेक्सिकोला बाहेर घालवण्यास पुरेसा ठरला.

मेक्सिकोने यापूर्वी सलग सात विश्वचषक स्पर्धांत शेवटच्या सोळा संघांत स्थान मिळविले होते. ही मालिका यावेळी खंडित झाली. पहिल्या दोन सामन्यात मेक्सिकोला गोल करण्यात अपयश आले होते. त्यामुळे आगेकूच करण्याची त्यांना किंचित संधी होती. याशिवाय अर्जेन्टिना-पोलंडच्या निकालावरही त्यांचे भवितव्य अवलंबून होते. मेक्सिकोने प्रारंभापासून जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या ओर्बेलिन पिनेदा व चॅवेज यांनी जबरदस्त खेळ केला. त्यांना रोखण्यासाठी सौदीलाही झगडावे लागत होते. उत्तरार्धातील दुसऱया मिनिटाला त्यांना पहिले यश मिळाले. सीजर माँटेसच्या बॅकहील पासवर मार्टिनने हा गोल नोंदवला. 52 व्या मिनिटाला चॅवेजने 20 मीटर्सवरून मारलेल्या जबरदस्त फ्री किकवर मेक्सिकोचा दुसरा गोल नोंदवला. नंतर लोझानोने गोल नोंदवला, पण तो नाकारण्यात आला. त्यानंतर मात्र मेक्सिकोला तिसऱया गोलसाठी बरेच झगडावे लागले. शेवटची चार मिनिटे असताना बदली खेळाडू युरियल ऍन्टुनाने शानदार गोल नोंदवला होता. पण ऑफसाईड ठरवून हा गोलही नाकारण्यात आला. स्टॉपेज टाईममध्ये अल दावसरीने गोल नोंदवल्यानंतर मेक्सिकोच्या आशा संपुष्टात आल्या.

अर्जेन्टिनाची उपांत्यपूर्व लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर पोलंडची लढत फ्रान्सविरुद्ध 4 डिसेंबर रोजी होणार आहे. अन्य उपांत्यपूर्व लढती नेदरलँड्स वि. अमेरिका, इंग्लंड वि. सेनेगल यांच्यात होणार आहेत.

Related Stories

सिनसिनॅटी स्पर्धेत व्हेरेव्ह, बार्टी विजेते

Patil_p

ऑस्ट्रेलियातील मदतनिधी सामन्यात लारा खेळणार

Patil_p

इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कारासाठी अर्शदीप सिंगची शिफारस

Patil_p

गुजरात जायंटसच्या मेंटरपदी मिथाली राज

Patil_p

गुजरात जायंटस्चा दुसरा विजय

Patil_p

मितालीच्या मानधनात कपात, ब यादीत समावेश

Patil_p