दोघांनाही तिसऱयांदा जेतेपद मिळविण्याची संधी, मेस्सी-एम्बापे यांच्यात जुगलबंदी अपेक्षित
वृत्तसंस्था/ दोहा
अर्जेन्टिना व फ्रान्स यांच्यात आज रविवारी विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी लढत होणार असून यापूर्वी दोन्ही संघांनी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्यात कोण बाजी मारतो याचा फैसला आज होणार आहे. यासाठी सुपरस्टार लायोनेस मेस्सी व फ्रान्सचा किलियन एम्बापे यांच्यातही चुरस पहावयास मिळणार आहे. रात्री 8.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
अर्जेन्टिनाच्या मेस्सीसाठी ही शेवटची स्पर्धा असल्याने आपल्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. तो एक महान खेळाडू आहे, यात शंकाच नाही. पण आजवर त्याला विश्वचषक मिळविता आलेला नाही. विश्वचषक जिंकण्याच्या निकषावरच त्याची महानता जोखली जाणार असल्याने ही कसर तो यावेळी नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. वयाच्या 35 व्या वर्षी तो हे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज झाला असून पेले व दिएगो माराडोना या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसण्यास तो उत्सुक झाला आहे. विद्यमान चॅम्पियन फ्रान्स व किलियन एम्बापे हा त्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा पार करण्याचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे.
23 वर्षीय एम्बापे हा भविष्यातील स्टार असून मार्क्वी खेळाडू म्हणून मेस्सी व रोनाल्डो यांची जागा तो निश्चितच घेणार आहे. तो इतिहास घडविण्याच्या मार्गावर असून पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेल्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची त्याला संधी मिळाली आहे. 2018 मधील स्पर्धा फ्रान्सने दुसऱयांदा जिंकली त्यावेळी एम्बापे 19 वर्षाचा होता. त्यावेळी तो फायनलमध्ये गोल नोंदवणारा पेले यांच्यानंतरचा दुसरा सर्वात युवा खेळाडू बनला होता. पेले यांनी 1958 मध्ये हा पराक्रम केला, त्यावेळी ते 17 वर्षांचे होते. 1962 मध्येही पेले यांनी जेतेपद पटकावले. पण त्यावेळी दुखापतीमुळे ते बाद फेरीत खेळू शकले नव्हते. गोल्डन बूटसाठीही मेस्सी व एम्बापे यांच्यात चुरस लागली असून दोघांचे प्रत्येकी 5 गोल झाले आहेत. गोल्डन बूटचा मानकरी कोण होणार, याचा फैसलाही आज लागणार आहे.
फ्रान्सला सलग दोनदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली असून यापूर्वी 1962 मध्ये ब्राझीलने हा पराक्रम केला होता. मिशेल प्लाटिनी, झिनेदिन झिदान, थिएरी हेन्री व आता एम्बापे यासारखे खेळाडू निर्माण केलेला फ्रान्स संघ गेल्या सात वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा अंतिम फेरीत खेळत असून अशी कामगिरी अन्य कोणत्याही संघाला करता आलेली नाही. डिडियर देशाँ हे त्यांचे प्रशिक्षक असून 1998 मध्ये खेळाडू म्हणून जेतेपद मिळविल्यानंतर आता प्रशिक्षक या नात्याने दुसऱयांदा जेतेपद मिळविण्याच्या तयारीत आहेत.
फ्रान्सप्रमाणे अर्जेन्टिनाही तिसऱयांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या मार्गावर असून यापूर्वी 1978 व 1986 मध्ये त्यांनी जेतेपद मिळविले होते. 36 वर्षाचा दुष्काळ संपवून सर्वकालीन संघांच्या यादीत चौथे स्थान मिळविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. 1986 च्या यशात माराडोना यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती आणि तेव्हापासून ते हिरो बनले होते. मेस्सीही त्याच मार्गावर असून पाच गोल नोंदवून आपल्या संघाला त्याने अंतिम फेरीत पोहोचवले आहे. याशिवाय त्याने तीन गोलसाठी असिस्ट केले आहे. मोरोक्कोप्रमाणे अर्जेन्टाईन चाहत्यांनीही या स्पर्धेसाठी प्रचंड गर्दी केली असल्याने अर्जेन्टिनासाठी हा ‘होम गेम’च असणार आहे.
फ्रान्सने या स्पर्धेत भक्कम प्रदर्शन केले असून अनेक अनुभवी खेळाडू त्यात आहेत. याशिवाय सर्वोत्तम खेळ होत नसतानाही सामने जिंकण्याची क्षमता या संघात आहे. पॉल पोग्बा, एन्गोलो कान्टे, प्रेस्नेल किमपेम्बे, बेन्झेमा यासारख्या अव्वल खेळाडूंच्या गैहजेरीतही डिडियर देशाँ यांनी फ्रान्सचा स्तर उंचावला आहे. अर्जेन्टिनाचा विचार करता मेस्सीकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी हा संघ तयार करण्यात आला आहे. प्रशिक्षक स्कॅलोनी उपांत्य लढतीप्रमाणे या सामन्यातही मध्यफळीची चौकडी निवडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणून चेंडू मेस्सीकडे सोपविल्यानंतर त्याची जादू पहावी, असे त्यांचे डावपेच असतील. जगभरातील चाहत्यांनाही मेस्सीला वर्ल्ड कप उंचावण्याची संधी मिळावी, असेच वाटते.