वृत्तसंस्था/ अँटवर्प
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या पहिल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे पहिल्यांदाच अजिंक्यपद अर्जेंटिनाच्या महिला हॉकी संघाने पटकाविले. या स्पर्धेत बेल्जियमने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केल्यानंतर अर्जेंटिनाचे या स्पर्धेतील जेतेपद निश्चित झाले.
या वर्षीच्या प्रो लीग हंगामातील भारतीय महिला हॉकी संघाला आपले शेवटचे चार सामने जिंकणे जरूरीचे होते पण बेल्जियमने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केल्याने अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सर्वाधिक गुण घेत आपले जेतेपद निश्चित केले. पुढील आठवडय़ात अर्जेंटिनाचा सामना भारताबरोबर होणार असला तरी या सामन्यातील निर्णायाचा त्यांच्या जेतेपदावर कोणताच परिणाम होणार नाही.
भारत आणि बेल्जियम यांच्यातील झालेल्या सामन्यात तिसऱया मिनिटाला बार्बरा निलेनने बेल्जियमचे खाते उघडले. 35 व्या मिनिटापर्यंत बेल्जियमने आपली आघाडी राखली होती. बेल्जियमचा दुसरा गोल ऍब्रे बॅलेनगेनने केला. भारतातर्फे एकमेव गोल 48 व्या मिनिटाला लालरेमसियामीने केला. या सामन्यात बेल्जियमच्या चार्लोट इंगेलबर्टला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यातील निकालानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीगमध्ये भारत तिसऱया तर बेल्जियम सहाव्या स्थानावर आहे.