बायर जनरेशन कप बुद्धिबळ स्पर्धा ः आर.प्रज्ञानंदचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
ज्युलियस बायर जनरेशन कप ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अर्जुन इरिगेसीने विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली तर आर. प्रज्ञानंद पराभूत झाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.
इरिगेसीने ख्रिस्तोफर यू याचा पराभव केला तर प्रज्ञानंदला जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या लेव्हॉन ऍरोनियनचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याची लढत 17 वर्षीय व्हिन्सेंट केमरविरुद्ध होईल तर दुसऱया उपांत्य सामन्यात इरिगेसी व व्हिएतनामचा लिएम कुआंग ली यांच्यात मुकाबला होईल.
19 वर्षीय इरिगेसी व 15 वर्षीय ख्रिस्तोफर यू यांच्यात चार रॅपिड डावानंतर 2-2 अशी बरोबरी झाली होती. इरिगेसीने पहिला डाव जिंकल्यानंतर यू ने दुसरा डाव जिंकला. नंतर याच क्रमाने पुढील दोन डावांचे निकाल लागले. ब्लिट्झ टायब्रेकमध्ये इरिगेसीने पहिला डाव जिंकला आणि दुसरा डाव अनिर्णीत राखत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
प्रज्ञानंदला उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या डावात पराभव स्वीकारावा लागल्याने तो पिछाडीवर पडला. त्यानंतरचे दोन डाव अनिर्णीत राहिल्यामुळे प्रज्ञानंदला शेवटचा डाव जिंकून टायब्रेकवर लढत नेणे आवश्यक होते. पण व्हिन्सेंट केमरने शेवटचा डाव 42 चालीत जिंकून प्रज्ञानंदचे आव्हान संपुष्टात आणले. कार्लसनने पहिला डाव गमविल्यानंतरही ऍरोनियनवर 3-1 असा विजय मिळविला. प्राथमिक फेरीतही त्याने फक्त एक सामना गमविला होता. अमेरिकेच्या नीमनविरुद्धचा डाव त्याने दोन चाली खेळल्यानंतर सोडून दिला होता. त्यामुळे नीमनला विजयी घोषित करण्यात आले होते.
अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत लिएम कुआंग लीने नीमनवर 2.5-1.5 अशा गुणांनी मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. पहिल्या तीन डावानंतर त्यांच्या 1.5-1.5 अशी बरोबरी झाली होती. चौथ्या सामन्यात लिएम कुआंगने विजय मिळवित आगेकूच केली. उपांत्य फेरीत चार डावांच्या दोन लढती होणार आहेत. प्राथमिक फेरीनंतर कार्लसनने सर्वाधिक 34 गुण नोंदवत अव्वल स्थान मिळविले होते. इरिगेसीने दुसरे तर प्रज्ञानंदने चौथे स्थान मिळविले होते. या स्पर्धेत एकूण 16 खेळाडूंनी भाग घेतला आहे.