Tarun Bharat

अर्जुन इरिगेसी, प्रज्ञानंद उपांत्यपूर्व फेरीत,

Advertisements

बायर जनरेशन कप बुद्धिबळ स्पर्धा : प्राथमिक टप्प्यानंतर कार्लसन अग्रस्थानी

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क

ज्युलियस बायर जनरेशन कप ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यानंतर भारताचे युवा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसी व आर. प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे दुसरे व चौथे स्थान मिळवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 

प्राथमिक टप्प्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने 34 गुण मिळवित अव्वल स्थान मिळविले. दुसऱया स्थानावरील अर्जुन इरिगेसीने 25 गुण मिळविले तर अमेरिकेच्या हान्स नीमनने 24 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन विजयाने सुरुवात केलेल्या आर.प्रज्ञानंदने एकूण 23 गुण घेतले. त्याने एकूण 5 विजय मिळविले, 2 पराभव स्वीकारले तर आठ सामने अनिर्णीत राखले. कार्लसन या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने प्राथमिक फेरीतील शेवटचे पाच सामने जिंकले, त्यातील तीन शेवटच्या दिवशी जिंकले. त्याने एकूण 10 विजय नोंदवले. अमेरिकेच्या हान्स नीमनविरुद्ध त्याला एकमेव पराभव स्वीकारावा लागला. नीमनविरुद्ध त्याने फक्त एक चाल करीत डाव सोडून दिला होता.

19 वर्षीय अर्जुन इरिगेसीने शेवटच्या दिवसाची सुरुवात अनिर्णीत सामन्याने केली. पोलंडच्या रॅडोस्लाव वोज्टाझेकविरुद्ध त्याने बरोबरी साधल्यानंतर त्याला जर्मनीचा व्हिन्सेंट केमर व हॉलंडच्या अनीश गिरीकडून पराभव स्वीकारावा लागले शेवटच्या दिवशी त्याला फारसे यश मिळाले नसले तरी त्याने दुसरे स्थान पटकावण्यात यश मिळविले. त्याने एकूण 7 विजय मिळविले, 4 सामने अनिर्णीत राखले तर 4 सामने गमविले.

17 वर्षीय आर. प्रज्ञानंदने शेवटच्या दिवसाची सुरुवात पराभवाने केली. अमेरिकेच्या लेव्हॉन ऍरोनियनने हरविले. त्यानंतर अनीश गिरीविरुद्ध त्याने बरोबरी साधली. 15 व शेवटच्या फेरीत त्याने क्रोएशियाच्या इव्हान सॅरिकवर विजय मिळविल्याने त्याला नीमननंतर 23 गुणांसह चौथे स्थान मिळविता आले. जर्मनीच्या केमरचेही 23 गुण झाले. या स्पर्धेत सहभागी झालेला तिसरा भारतीय बी.अधिबनने शेवटचे 16 वे स्थान मिळविले. त्याने फक्त एक विजय मिळविला तर 7 सामने अनिर्णीत राखले व 7 सामने गमविले.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने गुरुवारी रात्री उशिरा होत आहेत. ज्युलियस बायर जनरेशन चषक स्पर्धा ही मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरचा एक भाग असून तीन पिढय़ांतील 16 खेळाडू यात सहभागी झाले आहेत.

Related Stories

राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व

Patil_p

न्यूझीलंडची वनडे मालिकेत विजयी सलामी

Patil_p

कोव्हिडविरुद्ध लढा ही एक कसोटीच : कुंबळे

Rohan_P

डी कॉकच्या नाबाद शतकाने दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

Patil_p

चाहत्यांशिवाय खेळण्यात नेहमीचा थरार नसेल

Patil_p

सिंधू, प्रणित, सिक्की यांच्या सरावाला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!