निवृत्त शिक्षणाधिकाऱयांच्या घरातील 30 तोळे दागिन्यांसह रक्कम लंपास : पिता-पुत्री गंभीर
वार्ताहर /कोगनोळी
अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून 30 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री हणबरवाडी रस्त्यावरील कोगनोळी (ता. निपाणी) येथे घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात पिता-पुत्री गंभीर जखमी झाले आहेत. या दरोडय़ाच्या घटनेमुळे कोगनोळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रस्त्यावर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी चंद्रकांत यशवंत पाटील यांचे घर आहे. ते रात्री जेवण करून खोलीत झोपले होते. शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान मागील दाराचा कडी-कोयंडा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत असणारे साहित्य इतरत्र विस्कटले व त्यातील मौल्यवान वस्तू घेतल्या. या खोलीजवळ असणाऱया खोलीमध्येच दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यावेळी चंद्रकांत पाटील, त्यांची पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे झोपले होते.
दरोडेखोरांनी खोलीत प्रवेश करताच चंद्रकांत पाटील यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलगी ऐश्वर्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून सोडविण्यासाठी गेली असता तिलाही दरोडेखोरांनी मारहाण केली. यामध्ये दोघे पिता-पुत्री गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी या घरामध्ये असणारे 30 तोळे सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दरोडेखोर निघून गेल्यानंतर बाहेर येऊन पाटील कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने ही घटना शेजाऱयांच्या लक्षात आली.
त्यानुसार शेजाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तात्काळ त्या दोघा जखमींना कागल येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
आणखी दोन ठिकाणी चोरी
याच रात्री माळी गल्लीमध्ये दोन ठिकाणी चोरी झाली. येथील अंगणवाडी शिक्षिका संध्याराणी सुर्यवंशी यांच्या घराच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश करून चोरटय़ांनी चोरी केली. तर याच गल्लीतील सदाशिव माळी यांच्या घराची कडी मोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी चोरटय़ांच्या हाती काहीही लागले नाही. हणबरवाडी रोडवर असणाऱया मारुती पाटील यांच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणी किरकोळ चोरी केली. तर येथून काही अंतरावर असलेल्या भगवा रक्षक चौकाजवळ असणाऱया रावसाहेब धना-पाटील यांच्या घराचे दार मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. घटनास्थळी चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलगार, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिलकुमार कुंभार यांच्यासह अन्य पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
श्वानपथकाकडून माग काढण्याचा प्रयत्न
घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. चित्रा या श्वानाने घटनास्थळापासून हणबरवाडी रस्त्यावर असणाऱया ढोबळे पाणंद येथील अशोक मगदूम यांच्या शेतापर्यंत चोरटय़ांचा मार्ग दाखविला व श्वान याठिकाणी घुटमळले. या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.