दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत दाखवले शौर्य : ‘एक्सल’नंतर दुसरा मोठा धक्का
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेल्या लष्कराच्या ‘झूम’ या श्वानाने गुरुवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. दहशतवाद्यांशी लढताना गोळी लागून जखमी झालेल्या ‘झूम’ला 54 ऍडव्हान्स फील्ड व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लष्कराच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.45 वाजेपर्यंत ‘झूम’ची प्रकृती ठीक होती. पण त्यानंतर अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो कोसळला. दुपारच्या सुमारास ‘झूम’ने अखेरचा श्वास घेतल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा श्वान ‘झूम’ जखमी झाला होता. त्याला दोन गोळय़ा लागल्यानंतर उपचार करूनही ‘झूम’ला वाचवता आले नाही. अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ‘झूम’चा मागचा पाय दुखापतग्रस्त झाला होता. तसेच त्याच्या चेहऱयावरही जखम झाली होती. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी ‘झूम’च्या मदतीने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, चकमकीदरम्यान गोळी लागल्याने झूम गंभीर जखमी झाला.
दहशतवादी मोहिमांमध्ये सहभाग
‘झूम’ने अनेक दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. दहशतवादी लपलेले घर शोधून काढण्याचे काम ‘झूम’ला देण्यात आले होते. सोमवारीही अनंतनागमधील मोहिमेत तो सहभागी झाला होता. घरात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत त्याने हल्ला चढवला होता. यावेळी झालेल्या संघर्षात ‘झूम’ला दोन गोळय़ा लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. गोळय़ा लागल्या असूनही, झूमने लढा दिला आणि आपले शौर्य दाखवून दिले होते. त्याच्या लढय़ामुळेच या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले होते. तसेच, दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवानही जखमी झाले होते.
30 जुलै रोजी ‘एक्सल’चा लढा
‘झूम’च्या आधी यावषी 30 जुलै रोजी लष्कराच्या ताफ्यातील ‘एक्सल’ यानेही दहशतवाद्यांशी समर्थपणे लढा दिला होता. ‘एक्सल’ही शौर्य दाखवून हुतात्मा झाला. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एक्सल’ला मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.