बॉम्ब-भूसुरुंगांचा होणार नाही प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याला अत्याधुनिक स्वदेशी चिलखती वाहने मिळाली आहेत. ही चिलखती वाहने टाटा कंपनीने तयार केली आहेत. या वाहनाचे नाव क्विक रिऍक्शन फायटिंग व्हेईकल मीडियम (क्य्रूआरएफव्ही) ठेवण्यात आले आहे. अन्य चिलखती वाहनांच्या तुलनेत हे वाहन अधिक वेगाने धावू शकते. या वाहनावर असॉल्ट रायफल्सच्या गोळय़ा, बॉम्ब किंवा भूसुरुंगांचा प्रभाव पडत नाही.


क्यूआरएफव्हीची निर्मिती टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने केली आहे. हे चिलखती वाहन मोनोकोक हल मल्टी रोल माइन प्रोटेक्टेड आर्म्ड व्हेईकल आहे. म्हणजेच या वाहनाच्या खाली भूसुरुंगाचा स्फोट झाला तरीही यावर कुठलाच प्रभाव पडणार नाही. काही दिवसांपूर्वी दक्षिण सूदाननच्या एबी येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ मोहिमेत पहिल्यांदा भारतीय सैनिकांनी स्वदेशी चिलखती युद्धवाहनाचा वापर केला होता. भारतातून अशाप्रकारची दोन वाहने सूदानमध्ये पाठविण्यात आली होती.
दक्षिण सूदानमध्ये पाठविण्यात आलेली चिलखती युद्धवाहने देखील क्यूआरएफव्ही एम4 आर्म्ड पर्सनल कॅरियर आणि टाटा नेक्सॉन लाइट व्हेईकल्स होती. टीएएसएलच्या या वाहनांचा समावेश झाल्याने भारतीय सैन्याचे बळ वाढले आहे. सर्वप्रकारच्या संघर्षयुक्त भागांमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. या वाहनांमधील सैनिक कुठल्याही स्थितीत सुरक्षित राहणार आहेत.