6.9 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर इतर अनेक देशांमध्येही सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. न्यूझीलंडची भूमी पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्मयांनी हादरली. न्यूझीलंडमध्ये शनिवार, 4 मार्च रोजी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता भूकंपमापन यंत्रावर 6.9 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. केंद्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या उत्तरेकडील पॅसिफिक प्रदेशात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्यानंतर त्सुनामीचा कोणताही धोका सध्यातरी देण्यात आलेला नाही. तसेच भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
मोठय़ा धक्क्याबरोबराच न्यूझीलंडमधील केरमाडेक बेट भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली. भूकंप 183 किमी (113.71 मैल) खोलीवर होता. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा नसल्याचे अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने म्हटले आहे. गेल्या महिन्यातही न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. 15 फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये ‘गॅब्रिएल’ चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाले होते. चक्रीवादळामुळे अनेक भागात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हजारो घरांची वीज गेली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने सरकारने काही भागात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. तसेच शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली होती.