ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पश्चिम बंगालमध्ये उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी दुपारी ईडीने अर्पिताच्या बेलघरिया येथील दुसऱ्या घरी छापा टाकला. या ठिकाणाहून ईडीने तब्बल 28.90 कोटींची रोकड, 5 किलो सोने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
अर्पिता मुखर्जी ही पश्चिम बंगालचे उद्योगपती पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय आहे. शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने अर्पिताच्या घरावर पाच दिवसांपूर्वी छापा टाकला होता. पहिल्या छाप्यात ईडीनं 21.90 कोटी रुपयांची रोख रक्कम, 56 लाखांचं परदेशी चलन आणि 76 लाखांचं सोनं असा 23.22 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी अर्पिताच्या दुसऱ्या घरावर ईडीने छापा टाकला. तिथेही ईडीला पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील रोकड मोजण्यासाठी ईडीला दहा तास लागले.
दुसऱ्या छाप्यात तब्बल 28.90 कोटी रुपयांची रोकड, 5 किलो सोनं आणि काही महत्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती आली आहेत. अर्पिताने ही एवढी मोठी रक्कम तिच्या फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवली होती. ही रक्कम आणि इतर वस्तू नेण्यासाठी ईडीला चक्क मोठा ट्रक मागवावा लागला. दोन्ही छाप्यांमध्ये मिळून अर्पिता मुखर्जीच्या घरांमधून 45.22 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात ईडीने पार्थ चॅटर्जी यांनाही ईडीने अटक केली आहे. अर्पिताच्या घरातून ईडीला एक डायरी मिळाली आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत बऱ्याच नोंदी आहेत. त्यामधूनच या घोटाळय़ाचे अनेक पैलू समोर येऊ शकतात, असे सांगण्यात येते.