अचानकपणे डुकरे मृत पडू लागल्यामुळे दुर्गंधीमध्ये वाढ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात : नगरपंचायतीने बंदोबस्त करावा
वार्ताहर/किणये
मच्छे-पिरनवाडी गावात डुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही गावांत डुकरांचा वावर इतका वाढला आहे की नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. ही डुकरे शेतशिवारातील पिके फस्त करू लागली आहेत. तसेच थेट नागरिकांच्या घराच्या दरवाजापर्यंत येऊन ओरडू लागली आहेत. या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पिरनवाडी-मच्छे भागात डुक्कर बिनधास्तपणे फिरू लागली आहेत. त्यांचा वावरही अधिक वाढला आहे आणि अशा परिस्थितीतच ठिकठिकाणी हीच डुकरे अचानकपणे मृत्युमुखी पडू लागली आहेत. त्यांचे मृत शरीर काही ठिकाणी पडले असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन गेल्या काही महिन्यापूर्वी मच्छे नगरपंचायतीला ग्रामस्थांनी दिले आहे. तरीही याकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत.
पिरनवाडी-मच्छे ही गावे शहरालगत असल्यामुळे दोन्ही गावांचा विस्तार अलीकडे झपाटय़ाने वाढू लागला आहे. मात्र या गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून डुकरांचा वावर वाढलेला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कित्येकवेळा नगरपंचायतीला निवेदने देऊनही याकडे नगरपंचायतीच्या वतीने पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. अशा तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गावांच्या लगतच शेत-शिवार आहे. त्यात शिवारातील भात, भुईमूग, रताळी, बटाटा, ऊस व भाजीपाला पिके डुकरे फस्त करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
ही डुकरे गल्लीमध्येही बिनधास्तपणे फिरत आहेत. काहीवेळा तर डुकरे महिला व बालकांवर थेट हल्ला करू लागली आहेत. त्यामुळे महिलांसह पालकवर्ग भयभीत झाला आहे. मच्छे गावात डुकरांचा वावर अधिक वाढला असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही डुकरे पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी मच्छे नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना सुरेश लाड, चांगापा हावळ, संजय सुळगेकर, शंकर बेळगावकर, बसवंत नावगेकर, निंगाप्पा नावगेकर, नागेश गुंडोळकर, पिंटू बेळगावकर, बापू पुजारी, मारुती लाड, फकीरा नावलगेकर, महादेव मंगणाकर, असद हुजदार, मारुती लाड, पांडू लाड, अनिल कुमार अनगोळकर, सचिन बेळगावकर, भोमानी लाड, भुजंग लाड आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.
नगरपंचायतीने योग्य उपाययोजना करावी
पिरनवाडी भागात डुकरे अधिक झाली आहेत. ती बिनधास्तपणे फिरू लागली आहेत. थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊ लागली आहेत. यामुळे सारेजण भयभीत झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसापासून या भागात ठिकठिकाणी डुकरांचे मृत शरीर पडलेले आढळून येत आहेत. त्यामुळे दुर्गंधीमध्ये वाढ झालेली आहे. स्थानिक नागरिकांचे आरोग्य व त्यांना होणारा त्रास याकडे लक्ष देऊन पिरनवाडी नगरपंचायतीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी.
– मनोहर बिंदले :पिरनवाडी
संबंधित मालकांनी आपली डुकरे पकडून न्यावीत
गावातील देवस्थान पंचकमिटी व नागरिकांच्या वतीने मच्छे नगरपंचायतीला सदर डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही स्वतः जाऊन याबद्दल माहिती दिली आहे. अलीकडे तर काही ठिकाणी डुकरांचे मृत शरीर आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे सदर डुकरांना कोणी औषध वगैरे देत आहे का? असा संशयही निर्माण झाला आहे. यामुळे सदर डुक्करमालकांनी आपली डुकरे पकडून घेऊन जावीत, अशी आमची मागणी आहे.
– सुरेश लाड – मच्छे