निवडणुका बिनविरोध होण्यासाठी हालचाली : प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानुसार तयारी
बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक 2 जुलै रोजी होणार आहे. त्या निवडणुकीची तयारी कौन्सिल विभागाने सुरू केली असून मंगळवारी सभागृहामध्ये मतदानपेट्या ठेवणे, नगरसेवकांच्या आसनांची व्यवस्था करणे, तसेच इतर सर्व कामकाज करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी कौन्सिल विभागाला निवडणुकीची तयारी करावी लागत आहे. कारण अचानक कोणताही निर्णय बदलू शकतो. त्यामुळे कौन्सिल विभागाने प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानुसार तयारीला सुरुवात केली आहे.
महानगरपालिकेतील चार स्थायी समितींची निवडणूक घेण्याचे आदेश प्रादेशिक आयुक्तांनी दिले आहेत. त्या आदेशानुसार तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती कौन्सिल विभागाचे सेक्रटरी जे. महेश यांनी दिली आहे. कौन्सिल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदानपेट्या ठेवणे, त्याचबरोबर शहरातील प्रभागानुसार नगरसेवकांच्या नावाच्या पाट्या ठेवण्याचे काम केले आहे. स्थायी समितींची निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तरीदेखील नियमानुसार सर्व तयारी केली जात आहे. यापूर्वी सर्व नगरसेवकांना नोटिसा पोहोचविण्यात आल्या आहेत. याचबरोबर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी दिली गेली आहे. त्यानुसार ते सर्वजण काम करत आहेत.