एनआयएने अनिसला केरळात केले गजाआड
प्रतिनिधी /वास्को
देशभरात वादग्रस्त असलेल्या पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाचा वास्कोतील हस्तक अनिस अहम्मद याला अटक करण्यासाठी एनआयएने त्याच्या बायणातील घरावर टाकलेला छापा वास्कोत चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक लोकांना या घटनेमुळे धक्काही बसलेला आहे. अनिस अहम्मद याला केरळ राज्यात अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने चर्चेत अधिक भर पडलेली आहे. सध्या त्याचे कुटुंब वास्कोतील फ्लॅटमध्ये राहात नाही.
बायणा किनाऱया जवळच्या निवासी वसाहतीत अनिस अहम्मद याचे कुटुंब चाळीस वर्षांपूर्वीपासून राहात होते. मात्र, मागच्या दहा बारा वर्षांपासून ते कुटुंब वास्कोत राहात नाही. ते बेंगळूरला स्थायिक झाल्याचे बोलले जाते. बेंगळूरला गेल्या नंतरच तो पीएफआयमध्ये सहभागी झाला. बायणा किनाऱयावरील वसाहतीत त्यांचा फ्लॅट आजही आहे. मात्र, त्या फ्लॅटमध्ये एक मौलवी आपल्या पत्नीसह राहात असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली. अनिस अहम्मद या फ्लॅटमध्ये येत जात असावा असा संशय आहे. तो विघातक कारवायांमध्ये गुंतलेला असल्याचा संशय असून एनआयए त्याच्या मागावर होती. त्यामुळेच मुंबईहून आलेल्या एनआयएच्या पथकाने बायणातील इमारतीतील तिसऱया मजल्यावरील फ्लॅटवर छापा मारला. मात्र, तो हाती लागला नाही. त्याला केरळमध्ये गजाआड करण्यास एनआयएला यश आले आहे.
वास्कोत या छाप्याची गेले दोन दिवस चर्चा आहे. त्या कुटुंबाचा या वसाहतीत आता कुणी नसला तरी या वसाहतीतील लोक या कुटुंबाला जवळून ओळखतात. त्याना अनिस अहम्मदच्या कारवायांमुळे धक्काच बसला आहे. स्थानिक नगरसेवक रामचंद्र कामत याच वसाहतीत राहणारे असून अनिस अहम्मद हा त्यांच्या नजरेसमोरच लहानाचा मोठा झाला. त्याचे कुटुंब अत्यंत चांगले. कुणाबाबतही कसल्यास संशय घेण्यासारखी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही. अनिसही चांगला व हुशार होता. तो कधी चुकीचे काम करेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रीया नगरसेवक कामत यांनी व्यक्त केली. सध्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मौलाना राहतात व तेथे मदरसाही चालतो अशी माहिती त्यांनी दिली. विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांनी कडक नजर ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.