प्रतिनिधी /पणजी
कर्ज देण्याच्या नावाखाली सर्व सामान्य लोकांना लुटणाऱया जोडप्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या (साआयडी) पोलिसांनी अटक केली आहे. संशय़ितांच्या विरोधात भादंसं 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांची नावे अंकुश रामचंद्र कदम व पुजा अंकुश कदम अशी आहेत. संशयित मूळ चिंचाळे सांगली महाराष्ट्र येथील असून सध्या ते फोंडा येथे राहत होते. संशय़ितांच्या विरोधात 19 ऑक्टोबर 2022 रोजी सीआयडी विभागात तक्रार दाखल करण्यात आली होती.
संशयितांनी आत्तापर्यंत अनेकांना लुटले आहे. केवळ 4 टक्के व्यजजदरात कर्ज पाहिजे असल्यास संपर्क करा, एक कोटी ते 10 कोटी पर्यंत कर्ज दिले जाईल अशी जाहिरात विविध प्रसारमध्यमातून देत होते. जाहिरात वाचून एखादा गरजवंत कर्जासाठी त्यांच्या जवळ गेला की सुरुवातील प्रक्रिया फी व आगावू रक्कम मिळून कर्ज देण्याअगोदरच कर्जाच्या रक्कमेतील पाच टक्के रक्कम घेतली जात होती. नंतर काही दिवसांनी कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होईल असेही सांगितले जात होते. नंतर कित्येक दिवस झाले तरी कर्ज काही मिळत नव्हते अशा प्रकारे संशयितांना अनेकांना लुटले आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहे.