पारंपारिक वाद्यांसह, साऊंड सिस्टीमचा वापर, शहरातील प्रमुख मार्गावरून आगमन मिरवणूक
प्रतिनिधी/कोल्हापूर
दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंध उठल्याने यंदाच्या नवरात्रौत्सवात चैतन्याचे वातावरण आहे. सोमवारी नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला अन् दुपारनंतर मंडळांनी दुर्गामूर्तीची पारंपारिक वाद्यांसह साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात शहरातील प्रमुख मार्गावरून आगमन मिरवणूक काढली. रात्री उशिरा या दुर्गामातांची प्रतिष्ठापना करण्यात आली. काही मंडळांनी पहिल्याच दिवशी कुंकुमार्चन सोहळय़ाचे आयोजन केल्याचे दिसले.
कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला, गणेशाचे आगमन अन् विसर्जन मिरवणुकांतही हा जल्लोष दिसला. त्यानंतर पंधरा दिवसांनी आलेल्या नवरात्रौत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. यंदा शहरासह जिल्हय़ांतील नवरात्रौत्सव मंडळांत वाढ झाली आहे. तसेच महिला मंडळांकडून प्रतिष्ठापित होणाऱया दुर्गामूर्तींच्या संख्येतही वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणि सोमवारी दिवसभरात शहरातील कुंभारवाडय़ांतून दुर्गामूर्ती नेण्यासाठी मंडळांनी गर्दी केली होती. बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश अन् धोत्री गल्ली परिसरात सोमवारी दुपारनंतर दुर्गामूर्ती नेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते वाहनांसह दाखल झाले. अनेक मंडळांनी पारंपरीक वाद्यांसह लेसर शोसह साऊंड सिस्टीम आणली होती. मंडळांनी दुर्गामूर्तींची लेसर शो अन् साऊंड सिस्टीमच्या तालावर शहरातील प्रमुख मार्गावरून आगमन मिरवणूक काढली. रात्री दहाच्या सुमारास दुर्गामूर्तींची मंडळाच्या मंडपात विधीवत प्रतिष्ठापना केली.
हे ही वाचा : अंबाबाईचे दर्शन आता सर्वांनाच रांगेतून; पेड ईपासला न्यायालयाने नाकारली परवानगी
दरम्यान, काही मंडळांच्या दुर्गामूर्ती मिरवणुकीतील लेसर शो मार्गावरून जाताना अडचणीचा ठरल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचे चित्रही पहायला मिळाले. अनेक मंडळांनी दुर्गामूर्तीसमोर सोमवारी घटस्थापना केली. रात्री नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपांसमोर गरबा अन् दांडियाला प्रारंभ झाल्याचे चित्रही दिसून आले.