वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भुवनेश्वर-राऊरकेला येथे होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी तीनवेळा हॉकी विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया नेदरलँड्स पुरुष हॉकी संघाचे येथे बुधवारी आगमन झाल्यानंतर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. 13 ते 29 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
थियरी ब्रिन्कमनच्या नेतृत्वाखालील नेदरलँड्स संघ 10 जानेवारीला राऊरकेला येथे जाण्याआधी संपूर्ण तयारी भुवनेश्वरमध्येच करणार आहे. त्यांचा पहिला सामना 14 जानेवारी रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे. नेदरलँड्स संघ हा हॉकी जगतातील एक बलाढय़ संघ म्हणून ओळखला जात असून 1973, 1990 व 1998 असे तीन वेळा त्यांनी विश्वचषक जिंकला आहे.
नेदरलँड्स संघाचा क गटात समावेश असून याच गटात चिली, मलेशिया, न्यूझीलंड यांचाही समावेश आहे. स्पर्धेच्या दुसऱया दिवशी त्यांचा पहिला सामना झाल्यानंतर 16 जानेवारीला राऊरकेला येथेच दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि 19 जानेवारी रोजी गटातील शेवटचा सामना चिलीविरुद्ध भुवनेश्वर येथे होईल. गटसाखळीतील त्यांचे सर्व सामने दुपारी 3 वाजता सुरू होतील. स्पर्धेतील आव्हानाबाबत बोलताना या संघाचे प्रशिक्षक जेराँ डेल्मी म्हणाले की, ‘या संघात तरुण व नवोदित खेळाडू असून त्यांचा अननुभव हेच सर्वात मोठे आव्हान असेल. याशिवाय आम्हाला काही सरप्राईजेसनाही सामोरे जावे लागू शकते. त्यावर मात करण्यासाठी आपला संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. माझा या संघावर पूर्ण विश्वास आहे,’ असे ते म्हणाले.
या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड्स, भारत, अर्जेन्टिना, जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड, फ्रान्स, कोरिया, मलेशिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, जपान, चिली व वेल्स यांचा त्यात समावेश आहे.