शिशिरोत्सवाला थाटात प्रारंभ, कुंभारजुवेत भाविकांच्या उत्साहाला उधाण
कुंभारजुवे : कुंभारजुवेवासींयाचे आराध्य दैवत श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचे शिशिरोत्सवनिमित्त पारंपरिक शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या होडीतून माशेल तारीवाडामार्गे थापणार येथून गावांतवाडा कुंभारजुवे येथे थाटात आगमन बुधवारी 15 रोजी सकाळी 12.30 वा दरम्यान झाले. यामुळे संबंध कुंभारजुवेत चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. वार्षिक परंपरेनुसार माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरात धार्मिक विधी झाल्यानंतर श्रीची पालखी बँड पथकासह देऊळवाडा, बाजारवाडामार्गे माशेल तारीवाडा येथे पोहोचली. त्यांनतर होडीतून थापणांर येथे पालखीतून गावांतवाडा येथील उत्सवाच्या ठिकाणी विधिवत स्थानापन्न झाली आहे. 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 8 वा. सुरू होऊन दररोज रात्री 10 वा. विविध नाट्याप्रयोग व एक दिव ऑकेस्ट्रा होणार आहे. 22 मार्च रोजी गुढीपाडव्या दिवशी सकाळी धार्मिक विधीनंतर संध्याकाळी 3वा. संवत्सरफल वाचन, आरती, तीर्थप्रसाद होऊन ठिक 4 वाजल्यापासून श्रीच्या पालखीची कुंभारजुवे गावात घरोघरी पूजाअर्चा होणार आहे. सुमारे महिनाभर देवीची पालखी घरोघरी भेट देणार आहे. यानिमित्त काम धंद्यासाठी कुठेही असलेले कुंभारजुवेवासीय श्रीची ओटी भरण्यासाठी आपल्या घरी आवर्जून येतात.