Tarun Bharat

ब्रिटिशकालीन कार्यालयाला कला शिक्षकांनी दिले नवे रूप

शिक्षणाधिकारी कार्यालयाचा चित्रांद्वारे कायापालट

प्रतिनिधी /बेळगाव

क्लब रोड येथील ब्रिटिशकालीन शिक्षणाधिकारी कार्यालयाला कला शिक्षकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नवे रूप दिले आहे. कर्नाटकातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू, क्रांतिकारक, निसर्गसौंदर्य असणारी चित्रे कार्यालयाच्या भिंतींवर रेखाटण्यात आली आहेत. यामुळे कार्यालयात कामकाजासाठी येणाऱया नागरिकांनाही एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन आहे. 1928 मध्ये मुंबई प्रोव्हिन्सच्या शिक्षक निरीक्षकासाठी कार्यालय बांधण्यात आले होते. मागील 95 वर्षांपासून या ठिकाणी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांचे कार्यालय आहे. या कार्यालयातून बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात होणाऱया कामकाजाची दिशा ठरविली जाते. परंतु कार्यालयाच्या दुरुस्ती व रंगरंगोटीकडे यापूर्वीच्या शिक्षणाधिकाऱयांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे कार्यालयाचा परिसर गलिच्छ झाला होता.

नुकतीच कला शिक्षकांची कार्यशाळा येथे पार पडली. या शिक्षकांनी आपापल्यापरीने चित्रे रेखाटून कायापालट केला आहे. कला शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील ऐतिहासिक इमारती, मंदिरे, जैवविविधतेचे दर्शन घडविणारी चित्रे रेखाटली आहेत. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच दोन हत्ती स्वागतासाठी रेखाटण्यात आले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील शिक्षकांनी कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, सुवर्णसौधची चित्रे रेखाटली आहेत. उर्वरित राज्यांतील शिक्षकांनी गोकाकचा धबधबा, यान, मुर्डेश्वर, बदामी, ऐहोळे, दुर्गा मंदिर, लकुंडी मंदिर, गोलघुमट, धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालय, हावेरी येथील कनकदास स्मारक अशी चित्रे या परिसरात पाहायला मिळत आहेत.

कर्नाटक माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक वॉल्टर डिमेलो यांच्या प्रयत्नाने कला शिक्षकांचे शिबिर घेण्यात आले. कोडगू जिल्हय़ात त्यांनी असाच उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमामुळे ब्रिटिशकालीन कार्यालयाला नवीन चेहरा मिळाला आहे. कार्यालयात येणाऱया प्रत्येकाकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.   

Related Stories

सरस्वतीनगर येथे 3 लाखाची घरफोडी

Omkar B

शेतमजुरी करणाऱया महिलांनी दाखविला प्रामाणिकपणा

Patil_p

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी एकूण ७ एफआयआर दाखल

Archana Banage

पदवीपूर्व शिक्षण खात्यातील कर्मचाऱयांचे उद्या राज्यस्तरिय शैक्षणिक संमेलन

Omkar B

नदीकाठावरील नागरिकांना जिल्हाधिकाऱयांचे सतर्कतेचे आवाहन

Omkar B

पूरग्रस्त लाभार्थींना हक्कपत्र द्या!

Patil_p