Tarun Bharat

संसर्गाचा ताण वाढताच

मानवासह प्राणी जगतातही नवे संसर्ग दिसून येत आहेत. प्राण्यांकडून मानवाला पुढे मानवामुळे प्राण्याकडे असा संसर्गाचा प्रवास केव्हाही धोकादायकच. मात्र सर्वच संसर्ग मानवाकडून प्राण्याला किंवा प्राण्यांकडून मानवाला होत नाहीत. सध्याचा मंकीपॉक्स नवा आजार मानवाला संसर्गित करत असताना आफ्रिकन स्वाईन फिवर डुकरांना बाधित करत आहे. तर त्याचवेळी लंपी त्वचारोग जनावरांना छळत आहे. गुजरात महाराष्ट्र सीमेवरील लंपी आजारांची काळजी घेतली जात आहे. मानवी तसेच प्राण्यांमधील आजारांचा ताण वाढत असून दिवसागणिक आव्हानात्मकही ठरत आहेत….

स्वाईन फ्लू, इबोला, पोलिओ, झिका आणि कोविड हे आजार कमी पडतात की काय तोवर नव्या व्हेरियंटची भर पडत आहे. यंदा पाऊस नसतानाही साथरोगाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे दिसून आले. यासाठी मुंबई महानगरपालिका सावध आहेच. मुंबईकरांनाही सावध राहण्याचा इशारा हे साथरोग देऊन जात आहेत. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून सात राज्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढत असल्याचा इशारा देण्यात येतो. या सात राज्यात महाराष्ट्रदेखील आहे. त्यामुळेच किंचित चिंताही वाढत आहे. कोरोनायन शेवटच्या टप्प्यात असल्याचे वाटत असतानाच मागच्या आठवडय़ात केंद्रीय आरोग्य विभागाकडून रुग्ण वाढत असल्याचा इशारा दिला. महामारीच्या प्रतिबंधात्मक नियमांकडे सर्वजण बेफिकिरीने पाहत असल्याच्या तक्रारी होत असताना पुन्हा इशारे देण्यात येत असल्याचे गंभीर आहे. राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, ओडिसा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पत्रात भूषण यांनी कोरोनाच्या नियमांसह लसीकरणावर भर देण्याबाबत सुचविले आहे. दरम्यान इशारा देण्यात आलेल्या सात राज्यात कोरोनाचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा दहा टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी राज्यांतील जिह्यांमध्ये होणारी रुग्णवाढ, अचानक वाढणारा संसर्ग, त्यामागील कारणे यांचे निरीक्षण मांडण्याचे आदेश या पत्रातून देण्यात आले आहेत. त्यात भर म्हणजे तोंडावर आलेला दहिहंडी, गणेशोत्सवासारखा सणउत्सवाचा काळ. त्यामुळे कोविड19 बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. बेफिकिरीच्या वागण्यातून पुन्हा नव्या लाटेची सुरुवात होऊ नये अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणा मंकीपॉक्सवर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यात एकही मंकीपॉक्स पॉझिटिव्ह नसला तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनांप्रमाणे काळजी घेतली जात आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात 17 मंकीपॉक्स संशयितांचे नमुने तपासण्यात आले. मात्र याचे अहवाल निगेटिव्ह असल्याचेही सांगण्यात आले. ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, थकवा येणे, अंगावर अनेक ठिकाणी फोड येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. वेगाने पसरणारा मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे अमेरिकेने मागच्या आठवडय़ात घोषित केले. अमेरिकेत सात हजारांहून अधिक नागरिकांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. मात्र मंकीपॉक्समुळे अमेरिकेत अद्याप एकही मफत्यू झालेला नसल्याची दिलासादायी बाब आहे. दरम्यान भारतीय पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हायरल मंकीपॉक्स रोखण्यासाठी काय करावे तसेच काय करू नये याची यादी जारी केली आहे, कारण भारतात त्याची प्रकरणे वाढतच आहेत, दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत.

प्राणी जगतातही संसर्गबाधा ः

कोविड, मंकीपॉक्स इतरही साथरोग मानवी जीवनाला प्रभावित करत असताना आफ्रिकन स्वाईन फिवरबाबत पेंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. देशातील पूर्वोत्तर राज्यांत तसेच उत्तरप्रदेश व बिहार या राज्यात वराह प्रजातीत आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. त्यामुळेच पेंद्राकडून इतर राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सुचना दिल्या. आफ्रिकन स्वाईन फिवर हा डुकरांमधील विषाणुजन्य आजार असून एस्फीव्हायरस या विषाणूमुळे होतो. पाळीव तसेच रानटी डुकरांमध्ये देखील हा विषाणू आढळत आहे. या विषाणू बाधित डुकरांचे मृत्यू प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वराह पालन व्यवसाय करणाऱया पशुपालकांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र हा आजार डुकरांपासून मानवाला किंवा इतर प्राण्यांना होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा आजार सार्वजनिक आरोग्यास धोकादायक नसून राज्यात केवळ 1,61,000 डुकरे असल्याने ही संख्या मर्यादित आहे. त्यामुळे या संसर्गाची बाधा इतर पशुधनास होत नसल्याचे खात्रीलायक सांगण्यात येत आहे. एका विशिष्ट प्रजातीतील गोचीडाद्वारे या विषाणूचा प्रसार होत असून आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगावर प्रभावी औषधोपचार अथवा लसमात्रा उपलब्ध नसल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. तुर्तास घरगुती तसेच हॉटेलमधील वाया गेलेले खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. निरोगी वराहाचे घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराहपालन पेंद्रातील तसेच वराह मांस विक्री पेंद्रातील कचरा एकत्रित साठवून ठेवू नये. सर्व कचरा नष्ट करावा अशा सुचना राज्याचे पशुसंवर्धन आयुक्तांकडून देण्यात येत आहेत. डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिवर सुरु असताना गुजरात राज्यामधील काही जिह्यामध्ये जनावरांना लंपी त्वचा रोगाचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिह्यांमध्ये होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱयांना देण्यात आल्या. दुधदुभत्या जनावरांमधील गाई आणि म्हशींना लंपी हा विषाणूजन्य त्वचारोग होत असल्याचे सांगण्यात आले. देवी विषाणू गटातील पॅप्रील्पॉक्स विषाणू या प्रवर्गात हा आजार मोडत आहे. म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेमार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी करिता नमुने घेणे आवश्यक आहे. शेळ्या-मेढय़ांना होणाऱया देवीच्या विषाणूशी साधर्म्य या आजाराचे आहे. मात्र शेळ्या-मेंढय़ांना लंपी आजार होत नसल्याचे प्राण्यांचे डॉक्टर सांगतात. तसेच हा आजार जनावरांपासून मानवाकडे संक्रमित होत नसल्याची दिलासादायी बाब आहे. दरम्यान संकरित जनावरांमध्ये बाधेचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ञ सांगत आहेत. विषाणू रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. या आजाराचा प्रसार डास, माशा, गोचीड सारख्या बाह्यकीटकांद्वारे होत असून त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे 18 ते 35 दिवस जीवंत राहतो. लंपी त्वचा रोगामध्ये जनावरांना ताप येवून त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात. तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

तुर्तास मानवामधील संसर्ग आणि प्राण्यांमधील संसर्ग आजारांचा ताण वाढत आहे. अशावेळी सुचनांचे पालन करुन हा ताण सरकारी तसेच वैयक्तिक पातळीवरही कमी करण्याचा प्रयत्न करावा लागणारा आहे. अन्यथा नव्या आव्हानाची सुरुवात होऊ शकते.

राम खांदारे

Related Stories

‘पेगॅसिस’चे नेमके काय झाले ?

Amit Kulkarni

हिंदुत्व आणि हिंदू

Amit Kulkarni

शेतकऱयाचे ‘वांदे’

Patil_p

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य

Patil_p

आता चायना लस

Patil_p

शरीरबलसंधानम्…..(सुवचने)

Patil_p