Tarun Bharat

पालकमंत्री नसल्याने जिह्यातील मंजूर कामे थांबली

सरकार गप्प, विकासकामे ठप्प
कोरोना महामारीनंतर पुन्हा ब्रेक : खराब रस्ते तत्काळ दुरुस्तीची मागणी

Advertisements

कोल्हापूर /कृष्णात चौगले

महाविकास आघाडी सरकारला पायउतार करून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील सर्व मंजूर विकासकामे स्थगित केली. परिणामी दोन महिन्यांपासून जिह्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. 2019 ते 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे रखडलेल्या विकासकामांना काही महिन्यांपूर्वीच गती मिळाली असताना सत्ता नाटय़ामुळे पुन्हा ब्रेक लागला आहे. प्रत्येक जिह्यात पालकमंत्र्यांची निवड करून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांची यादी पाहिल्यानंतरच कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ पालकमंत्र्यांची नियुक्ती करून स्थगित कामे सुरु करावीत, अशी मागणी होत आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार सुरु झाल्यानंतर एप्रिल 2021 पासून महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या दिवसापर्यंत निविदा न झालेली कामे स्थगित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा नियोजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे आदी सर्व शासकीय विभागांमार्फत मंजूर झालेली पण निविदा न झालेली कामे स्थगित करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात वर्कऑर्डर मंजूर झालेल्या विकासकामांखेरीज अन्य कोणतेही काम नव्याने सुरु झालेले नाही. राज्यासह जिह्यातील ग्रामीण, जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गाची सद्यस्थिती पाहता वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. तर शाळा, अंगणवाडीसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींबरोबरच अन्य प्रशासकीय इमारतींची कामे ठप्प झाली आहेत.

कोटय़वधींच्या विकासकामांना ब्रेक

जिल्हा नियोजन विभागाच्या 425 कोटींच्या आराखडय़ातील चालू अर्थिक वर्षातील सुमारे 10 कोटी आणि गत अर्थिक वर्षातील 90 कोटी अशी सुमारे 100 कोटींची कामे वगळता 325 कोटींच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. जिह्याचे पालकमंत्री कोण? हे निश्चित झाल्यानंतरच ही कामे सुरु होणार आहेत. सद्यस्थितीत पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आमदार विनय कोरे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर व आमदार चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. पण जिह्याचा विकास रखडल्यामुळे ‘कोणीही असो, पण पालकमंत्री द्या’ अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

जिह्यातील ‘ग्रामविकास’ रखडला

शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणाऱया सुमारे 25 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते, गटर्स, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, शाळांची संरक्षण भिंत, सुविधा गृह, मैदान सपाटीकरण, बागबगीचा, ओपन जीम यासह गावांत अन्य मुलभूत सुविधा व इतर विकासकामे ठप्प झाली आहेत.

ग्रामपंचायत इमारत बांधणीची कामे स्थगित

शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिह्यातील 48 ग्रामपंचायत इमारत बांधणीची मंजूर कामे स्थगित झाली आहेत. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत इमारतीसाठी 18 लाखांचा निधी मंजूर आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील 4, गडहिंग्लजमधील 3, करवीरमधील 11, पन्हाळा 5, हातकणंगले 5, भुदरगड 3, राधानगरी 4, आजरा 1, शिरोळ 5, शाहूवाडी 6 आणि गगनबावडा तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के रूग्ण लस न घेतलेले

Archana Banage

पीएम किसान योजनेत गौडबंगाल! राजू शेट्टी

Archana Banage

पाचवी माळ : करवीर निवासिनी अंबाबाईची आजची ‘गजारूढ’ पूजा

Archana Banage

एका शिक्षण संस्थेसह ११ शिक्षकांना डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार जाहीर

Archana Banage

कोल्हापूर : मुलीसह आईची वारणा नदीत उडी मारुन आत्महत्या

Archana Banage

पदोन्नतीसाठी विज्ञान शिक्षकांची शुक्रवारी धरणे

Archana Banage
error: Content is protected !!