गांधीनगर न्यायालयाकडून आज होणार शिक्षेची घोषणा
वृत्तसंस्था / गांधीनगर
गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायालयाने महिलेवर बलात्काराप्रकरणी आसाराम बापू यांना सोमवारी दोषी ठरविले आहे. 2013 मध्ये सूरत येथील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्यासह त्यांचा मुलगा नारायण साई देखील आरोपी होती.
याप्रकरणी आसाराम यांच्या पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी धूवबेन, निर्मला, जस्सी तसेच मीरा यांनाही आरोपी करण्यात आले होते. या सर्वांची गांधीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात कैद आहेत. याप्रकरणी त्यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. 2013 मध्ये सूरत येथील दोन बहिणींनी नारायण साई तसेच आसाराम बापू यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता.
सूरत येथील आसाराम यांच्या आश्रमात राहत असताना नारायण साईने बलात्कार झाल्याच आरोप छोटय़ा बहिणीने केला होता. तर अहमदाबाद येथील आश्रमात आसाराम यांनी आपल्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप मोठय़ा बहिणीने केला होता.
आसाराम बापू यांना बलात्काराच्या एका वेगळय़ा प्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा जोधपूर येथील न्यायालयाने 2018 साली सुनावली होती. 2013 मध्ये जोधपूर येथील आश्रमात एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम दोषी ठरले होते.
तुरुंगात कैद आसाराम बापूंनी अलिकडेच न्यायालयाकडून जामिनाची मागणी केली होती. मागील 10 वर्षांपासून तुरुंगात कैद असून माझे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे, तसेच अनेक गंभीर आजारांना तोंड देत असल्याचे त्यांनी स्वतःच्या जामीन अर्जात नमूद केले होते.