नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी मोजक्या उपस्थितीत पार पडला. कोरोनामुळे विविध नियम बंधनांमध्येच मागील वर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या हजेरीत विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे कोरोनाचं संकट दूर कर, अशीच प्रार्थना केली. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खास मराठीतून ट्वीट करुन सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्वीट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे.
आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी, आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात केली.