विविध गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन : भजन-अभंगात भाविक मग्न
वार्ताहर /किणये
झाले समाधान । पायी विसावले मन ।।
आता कोठे धावेमन । तवचरण देखलिया ।।
या अभंगाप्रमाणेच अनेक दिवसांपासून आस लागून राहिलेला वैष्णव भक्त आषाढी वारी एकादशीच्यानिमित्ताने समाधानी झाला आहे. सावळय़ा विठुरायाचे दर्शन घेऊन आमच्या जीवनाचे सार्थक झाले आहे. असाच भाव वारकऱयांच्या चेहऱयावर दिसून आला.
रविवारी तालुक्यात आषाढी एकादशी मोठय़ा भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विविध गावांमध्ये असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये पहाटेपासूनच काकड आरतीचा गजर सुरू झाला. दिवसभर भजन, प्रवचन, कीर्तन यामुळे अवघा तालुका विठु नामाच्या गजरात तल्लीन झाला होता.
अनेक गावांमध्ये असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. विठ्ठल-रखुमाई मूर्तीला अभिषेक करण्यात आला, महाआरती केली. काही गावांमध्ये पालखी-दिंडय़ाही काढण्यात आल्या.
तालुक्यातून हजारो वारकरी पंढरपूरला गेलेले आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान करून विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि ‘हा आनंद सुखसोहळा। स्वर्गा नाही।।’ याचीच प्रचिती आम्हाला आली, असे कणबर्गी व अष्टे येथील पायी दिंडीतून पंढरपूरनगरीत दाखल झालेल्या वारकऱयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील वारकऱयांच्या आषाढी, कार्तिकी व माघ अशा तीन वारी करतात. आषाढी एकादशीला पंढरपुरला न गेलेल्या वारकऱयांनीही आपापल्या घरात व गावांमधील मंदिरांमध्ये विठ्ठलाची मनोभावे पूजा-अर्चा केली.
गळय़ात माळ, हातात टाळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर पताका, मनी शुद्ध भाव आणि मुखात विठ्ठल नामाचा जयघोष करणारे वारकरी रविवारी तालुक्याच्या अनेक गावातील मंदिरांमध्ये दिसून आले. विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक संताच्या चरणीशी नतमस्तक होतानाचे दृश्य पाहावयास मिळाले.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिरे फुले-हारांनी सजविण्यात आली होती. मंदिरांमध्ये पहाटे ‘उठा जागे व्हारे आता । स्मरण करा पंढरीनाथा ।।’ असे म्हणत काकड आरत्या झाल्या. या काकड आरतीला त्या-त्या गावांमधील महिला आरत्या घेऊन सहभागी झाल्या होता.
वारकऱयांनी उपवास करून दिवसभर विठ्ठलाची उपासना केली. मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम सूरू होते. काही दानशूर मंडळी मंदिरातील भक्तांना केळी व विविध प्रकारची फळे वाटप करीत होते. सोमवारी सकाळी द्वादशीचा नैवेद्य करून वारकरी एकादशीचा व्रत पूर्ण करणार आहेत.
कडोलीत आषाढी एकादशी साजरी
टाळ-मृदंग आणि भजनाच्या गजरात कडोली येथे आषाढी एकादशी भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. कडोली येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटे काकड आरती आणि पूजा-अर्चा झाल्यानंतर आषाढी एकादशीला उत्साहात प्रारंभ झाला. श्री कलमेश्वर भजनी मंडळ आणि श्री कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाने आणि भजनाने सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. आषाढी एकादशीनिमित्त कडोली येथील श्री विठ्ठल-रखुमाईच्या दोन्ही मंदिरांत भाविकांनी गर्दी केली होती.