ऑनलाईन टीम/ तरुण भारत
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा ताफा अडवून पैशे मागणाऱ्या हॉटेल मालका विरोधात सोलापुरात (Solapur) गुन्हा दाखल झाला आहे. रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अशोक शिनगारे असे गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर ताफा आल्यानंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत हे पंचायत राज बैठकीच्या निमित्ताने सांगोला दौऱ्यावर काल गेले होते. दरम्यान, गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्या असे म्हणत अशोक शिनगारे (Ashok Singare) याने सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. हे राष्ट्रवादीचे (NCP) कारस्थान असल्याचे सांगत असे कोणतेही पैसे राहिले नसल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा- राज्यात 19 जूनपासून पाऊस जोर धरणार
आज सदाभाऊंनी पत्रकार परिषद घेत अशोक शिनगारें विरोधात विविध गुन्हे दाखल असून, सोने चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. त्याशिवाय चेक बाउन्स प्रकरण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल असल्याचेही सांगितले. यावेळी बोलताना खोत म्हणाले, व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे. त्याने या व्हिडिओसाठीची तयारी केली होती. शिनगारे यांना जेवढे सांगितले होते, तेवढीच वाक्ये तो बोलत होता.. ताफा आल्यानंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. या नेत्याचे नाव योग्य वेळी सांगणार असल्याचे सांगितले.