वृत्तसंस्था/ दुबई
मागील आठवडय़ात जेम्स अँडरसनला मागे टाकत भारताच्या रविचंद्रन अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात पहिले स्थान पटकावले होते. पण अँडरसनने पुन्हा मुसंडी मारत अश्विनला गाठले असून ताज्या मानांकनात अँडरसन व अश्विन संयुक्त पहिल्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱया कसोटीत अश्विनने 3 बळी मिळविले. मात्र त्याचे रेटिंग 6 अंकानी घसरल्याने त्याचे अँडरसनइतकेच 859 गुण झाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्ध दोन कसोटीत गैरहजर होता, तरीही तो तिसऱया स्थानावर कायम असला तरी त्याचे रेटिंगही 849 वर घसरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या मानांकनात सुधारणा होत असून 807 गुणांसह तो चौथ्या स्थानावर आहे. विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने 8 बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नाथन लियॉननेही प्रगती केली असून तो टॉप टेनमध्ये दाखल झाला आहे. पाच स्थानांची प्रगती करीत तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या तिसऱया कसोटीत त्याने 11 बळी मिळविले.
फलंदाजांत पहिल्या दहामध्ये केवळ एक बदल झाला असून ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने दोन स्थानांची प्रगती करीत नववे स्थान घेतले आहे तर द.आफ्रिकेचा फलंदाजा एडन मार्करमने 21 स्थानांची बढती मिळवित 33 वा क्रमांक पटकावला आहे. विंडीजच्या जर्मेन ब्लॅकवूडनेही प्रगती केली असून त्याने 12 स्थानांची बढती घेत 35 वे स्थान मिळविले आहे.