प्रतिनिधी / सातारा :
येथील जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा विशेष शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये सातारा जिल्हा पोलिस दलाच्या जिल्हा विशेष शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.
संभाजी बनसोडे हे दि. 25 ऑगस्ट 1990 मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पाचगणी येथील पोलीस ठाण्याच्या विशेष पथकामध्ये उत्कृष्ट काम केले. सन 2010 मध्ये सातारा येथील विशेष पथकात कार्यरत असताना काही दरोडेखोर सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांनी दरोडेखोरांना पकडण्याची मोलाची कामगिरी केली होती. सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात सापळा कारवाईमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. 2016 मध्ये त्यांना अति उत्कृष्ट सेवेबाबत मुंबई पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक प्राप्त झाले होते. सध्याचे पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.
सन 2020 मध्ये प्रशंसनीय सेवेबाबत त्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पदक जाहीर केले. या पत कांबळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवल्याचे मानण्यात येते. गेल्या 32 वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये बनसोडे यांना एकूण 360 बक्षिसे प्राप्त झाली आहेत.