टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशियाई संघांची रंगीत तालीम
अफगाणिस्तान-श्रीलंका यांच्यात आज सलामीची लढत, उद्या भारत-पाकिस्तान आमनेसामने
दुबई / वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरातीत आजपासून (शनिवार दि. 27) आशियाई टी-20 चषक स्पर्धेला सुरुवात होईल, त्यावेळी टी-20 क्रिकेट प्रकारातील कमालीची अनिश्चितता आणि या क्रिकेट प्रकारातील आशियाई संघांचा परिपूर्णतेकडील प्रवास, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येण्याची अपेक्षा आहे. आज सलामी लढतीत अफगाणिस्तान-श्रीलंका आमनेसामने भिडणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
पाकिस्तानचा लिजेंड वासिम अक्रमने यंदा कोणीही फेवरीट नसेल, स्पर्धेतील सहाही संघ फक्त जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरतील, असे यापूर्वी म्हटले असून एकमेव पात्रताधारक हाँगकाँग संघाचा अपवाद वगळता ते खरेही आहे. सातवेळचा विजेता संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान व बांगलादेशचे संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघांना केव्हाही धूळ चारण्यासाठी सक्षम असतील.
6 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा टी-20 स्वरुपात खेळवली जाणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतत असलेल्या विराट कोहलीकडे चाहत्यांचे खास लक्ष असेल. कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल देखील ताज्या दमाने फटकेबाजीसाठी प्रयत्नशील असतील. जसप्रित बुमराहची मात्र उणीव जाणवणार आहे.
10 वर्षांपूर्वी आशिया चषकाचे जेतेपद मिळवणाऱया पाकिस्तानचा संघ मागील वर्षभरात उत्तम बहरात राहिला आहे. मात्र, स्टार पेसर शाहिन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर फेकला गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला. मध्यफळी कमकुवत असल्याने या संघाला बाबर आझम व मोहम्मद रिझवान या सलामीवीरांवरच अवलंबून रहावे लागेल.
अनुभवी मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणचा संघ आपल्यापेक्षा सरस मानांकित संघांना धोबीपछाड देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असून नेहमीप्रमाणे रशिद खान यंदाही त्यांचे ट्रम्प कार्ड असणार आहे. नवे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकन संघात बरीच गुणवत्ता असून मायदेशातील प्रतिकूल स्थिती बाजूला ठेवून ते येथे यश खेचून आणण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरतील.
विश्वचषक स्पर्धेनंतर या छोटेखानी क्रिकेट प्रकारात झगडावे लागलेल्या बांगलादेशला यंदा शकीब हसनच्या नेतृत्वाखाली बऱयाच आशाअपेक्षा आहेत. अलीकडेच त्यांनी श्रीधरन श्रीराम यांना तांत्रिक संचालक म्हणून नियुक्त करत टी-20 क्रिकेट प्रकारात संघाची नव्याने बांधणी करण्यावर भर दिला आहे.
भारत-पाकिस्तानच्या गटात हाँगकाँगचा समावेश असून ते यंदा आशिया चषकासाठी चौथ्यांदा पात्र ठरले आहेत. ओमानमध्ये संपन्न झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातला पराभूत करत पात्रता मिळवली आहे.
स्पर्धेत सहभागी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान. राखीव खेळाडू ः श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम ज्युनियर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी, उस्मान कादीर.
बांगलादेश ः शकीब हसन (कर्णधार), अनामूल हक, मुश्फिकूर रहीम, अफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन, महमुदुल्लाह, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दिन, हसन महमूद, मुस्तफिजूर रहमान, नसूम अहमद, शब्बीर रहमान, मेहदी हसन मिराझ, इबादत हुसेन, परवेझ हुसेन इमोन, नुरुल हसन सोहन, तस्किन अहमद.
श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, पथूम निसांका, कुशल मेंडिस, चरिथ असलंका, भानुका राजपक्ष, अशेन बंदारा, धनंजया डीसिल्व्हा, वणिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, जेफ्री व्हॅन्डरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशनका, मथिशा पथिराणा, नुवानिदू फर्नांडो, दिनेश चंडिमल.
अफगाणिस्तान ः मोहम्मद नबी (कर्णधार), नजिबुल्लाह झद्रन (उपकर्णधार), अफसर झझाई (यष्टीरक्षक), अझमतुल्लाह, फरिद अहमद मलिक, फझल हक फारुकी, हसमतुल्लाह शाहिदी, हझरतुल्लाह झझाई, इब्राहीम झद्रन, करीम जनत, मुजीब उर रहमान, नवीन अल हक, नूर अहमद, रहमनुल्लाह गुरबाझ (यष्टीरक्षक), रशिद खान, समिउल्लाह शिनवरी, उस्मान घनी.
हाँगकाँग ः निझाकत खान (कर्णधार), किंचित शाह, झिशान अली, हरुन अर्शद, बाबर हयात, आफताब हुसेन, अतिक इक्बाल, एझाझ खान, एहसान खान, स्कॉट मेकॅनी (यष्टीरक्षक), घझनफर मोहम्मद, यासिम मुर्तझा, धनंजय राव, वाजिद शाह, आयुष शुक्ला, अहन त्रिवेदी, मोहम्मद वाहिद.
तसे घडले तर यंदा भारत-पाकिस्तान चक्क तीनवेळा आमनेसामने भिडणार!
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या (रविवार दि. 28) होणारी लढत मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. मात्र, या स्पर्धेतील विविध फेऱयांचे स्वरुप पाहता यंदा हे दोन्ही कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी केवळ एकदाच नव्हे तर तीनवेळा आमनेसामने भिडू शकतात!
दोन्ही संघात साखळी फेरीत पहिली लढत उद्या होईल. त्यानंतर सुपर-फोर फेरीत दोन्ही संघ पोहोचले तर त्यात आणखी एक लढत होईल व याच दोन्ही संघांनी फायनलमध्येही स्थान निश्चित केले तर त्यावेळी उभय संघात स्पर्धेतील तिसरी लढत देखील होऊ शकते. या स्पर्धेतील जेतेपदाचा फैसला दि. 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पेसर मोहम्मद वासिमला पाठदुखी, पाकिस्तानला आणखी एक धक्का
स्पीडस्टार शाहिन आफ्रिदी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यानंतर जलद गोलंदाज मोहम्मद वासिमला पाठदुखीचा त्रास सुरु झाल्याने पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. 21 वर्षीय मोहम्मद वासिमने पाठदुखी जाणवत असल्याचे सांगितल्यानंतर एमआरआय स्कॅनिंग केले गेले. गतवर्षी जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर वासिमने 8 वनडे व 11 टी-20 सामने खेळले आहेत.
शाहीन विराटला म्हणाला, ‘आपके लिए दुआए कर रहे है की वापिस फॉर्म मे आये’!
भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने भिडतात, त्यावेळी त्या लढतीला महायुद्धाचे स्वरुप दिले जाते आणि साहजिकच तणाव खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत जाणवत राहतो. मात्र, दोन्ही संघातील बऱयाच खेळाडूंचे यानंतरही मैत्रिपूर्ण संबंध असतात आणि याचा दाखला विराट-शाहिन यांच्या भेटीने आणखी एकदा मिळाला.
पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक लढतीपूर्वी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली व दुखापतग्रस्त स्पीडस्टार शाहिन आफ्रिदी यांच्यात काही वेळ चर्चा झाली आणि याची छायाचित्रे मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने देखील या उभयतांच्या भेटीचा व्हीडिओ शेअर केला असून या भेटीत शाहिन विराटला म्हणाला, ‘आपके लिए दुआए कर रहे है की वापिस फॉर्म मे आये’!
विराटने याबद्दल शाहिनचे आभार मानले. शिवाय, दुखापतीतून सावरत शक्य तितक्या लवकर पुनरागमन करण्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराट
सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / अर्धशतके
7 / 311 / 78 / 77.75 / 3
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट
सामने / धावा / सर्वोत्तम / सरासरी / अर्धशतके / स्ट्राईक रेट
99 / 3308 / 94 / 50.12 / 30 / 137.66
हाँगकाँग संघातील सर्व खेळाडू विदेशी वंशाचे!
आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱया 17 सदस्यीय हाँगकाँग संघात त्यांचा मूळचा एकही खेळाडू समाविष्ट नाही. या 17 सदस्यीय संघात 12 खेळाडू पाकिस्तानी वंशाचे, 4 खेळाडू भारतीय वंशाचे आहेत तर एक खेळाडू ब्रिटीश वंशाचा आहे. हाँगकाँगने आजवर 52 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असून त्यात त्यांनी 20 विजय व 32 पराभव, अशी कामगिरी नोंदवली आहे.
हाँगकाँग संघातील भारतीय वंशाच्या 4 खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक किंचित शाह, धनंजय रॉय, आयुष शुक्ला व अहान यांचा समावेश आहे.
यापैकी, किंचित शाहचा जन्म दि. 9 डिसेंबर 1995 रोजी मुंबईत झाला. नंतर तो हाँगकाँगमध्ये वास्तव्यास गेला. त्याने आतापर्यंत 10 वनडे व 43 टी-20 सामने खेळले आहेत. धनंजय रॉयचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला असला तरी त्याचे आई-वडील भारतीय आहेत. याशिवाय आयुष शुक्लाने 5 टी-20 सामन्यात 5 बळी घेतले आहेत तर अहान येथे आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवणार आहे.
हाँगकाँगच्या 17 खेळाडूंची वर्गवारी
पाकिस्तानी वंशाचे खेळाडू ः 12
भारतीय वंशाचे खेळाडू ः 4
ब्रिटीश वंशाचा खेळाडू ः 1
यांच्यात जुगलबंदी रंगणारच!
1) हार्दिक पंडय़ा विरुद्ध मुश्फिकूर रहीम
6 वर्षांपूर्वी 23 मार्च 2016 रोजी जे घडले ते मुश्फिकूर रहीम कधीच विसरु शकणार नाही. टी-20 वर्ल्डकपमध्ये त्यावेळी बांगलादेशचा संघ भारताला स्पर्धेतून बाहेर फेकण्याच्या उंबरठय़ावर होता. 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता होती आणि समोर गोलंदाज होता हार्दिक पंडय़ा! प्रारंभीच्या फटकेबाजीनंतर शेवटच्या 3 चेंडूत बांगलादेशला केवळ 2 धावांची गरज होती. मुश्फिकूर त्यावेळी जोशात होता. पण, अचानक सारे चित्र पालटले. हार्दिकने त्यावेळी 3 चेंडूत 3 फलंदाज मिळवले आणि भारताने तो सामना अवघ्या एका धावेने जिंकला. यंदा पंडय़ा-रहीम आमनेसामने भिडतील, त्यावेळी या आठवणीला उजाळा मिळेल.
2) बाबर आझम विरुद्ध रशिद खान
पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम जलद गोलंदाजीचा समाचार घेण्यात माहीर आहे आणि याची सर्व सहभागी संघांना पूर्ण कल्पना देखील आहे. मात्र, त्या तुलनेत बाबर फिरकी गोलंदाजांना खेळताना काहीसा झगडतो, असे चित्र असून यामुळे अफगाणचा फिरकीपटू रशिद खानविरुद्ध त्याची जुगलबंदी लक्षवेधी ठरु शकते. आतापर्यंत रशिदने बाबरला 5 सामन्यात 5 वेळा बाद केले आहे तर बाबरने रशिदच्या गोलंदाजीवर 48 चेंडूत 59 धावा केल्या आहेत.
3) विराट कोहली विरुद्ध वणिंदू हसरंगा
प्रदीर्घ ब्रेकवर जाण्यापूर्वी विराट कोहलीला बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात अनेकदा बाद व्हावे लागले असून वणिंदू हसरंगाचा उत्तम फॉर्म पाहता तो विराटच्या अडचणीत आणखी भर घालण्यासाठी प्रयत्नशील असेल. योगायोगाची बाब म्हणजे आशिया चषकात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे विराट-हसरंगा आयपीएलमध्ये मात्र आरसीबीचे घनिष्ठ संघसहकारी आहेत! यामुळे, अर्थातच त्यांना एकमेकांच्या कमकुवत बाजू ज्ञात असून याचा लाभ कोणाला घेता येणार, हे सामन्यात सुस्पष्ट होऊ शकते.