वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2024 साली होणाऱया पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चालू वर्षाच्या अखेरीस होणारी हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धा हॉकी या क्रीडा प्रकाराकरिता पात्रतेची राहिल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष इक्रम तयाब यांनी रविवारी येथे केली.
भुवनेश्वरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी अध्यक्ष इक्रम तयाब हे उपस्थित होते. हेंगझोयु आशियाई स्पर्धा सुरुवातीला गेल्या वर्षीच चीनमध्ये घेण्यात येणार होती पण या देशातील कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष इक्रम तयाब हे पाकमध्ये जन्मलेले असून ते मॅकॉवचे रहिवासी आहेत. हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वयक समितीचे इक्रम तयाब हे सदस्य आहेत. या समितीचे प्रमुख भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी सरचिटणीस तसेच आशिया ऑलिम्पिक मंडळाचे प्रमुख रणधीर सिंग हे आहेत. येत्या मार्चमध्ये हेंगझोयु येथे आशियाई क्रीडा स्पर्धा समन्वयक समितीची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती तयाब यांनी दिली आहे. या स्पर्धेसाठी हेंगझोयु हे शहर आतापासूनच सज्ज करण्यात आले आहे. 2024 साली होणाऱया पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धा ही हॉकीसाठी पात्र फेरीची राहणार असल्याचे तयाब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात पुरुष आणि महिलांच्या विविध गटांमध्ये प्रत्येकी 12 संघांचा समावेश राहिल. यजमान फ्रान्सला या दोन्ही गटामध्ये यजमान असल्याने थेट प्रवेश देण्यात येईल. 31 जानेवारी 2023 रोजी घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्व मानांकनाच्या आधारे विविध खंडातील हॉकी संघांची निवड केली जाईल. आंतरखंडीय पात्र फेरी स्पर्धेतील पहिले तीन संघ पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले जातील.