Tarun Bharat

असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

माजी आयएसआय प्रमुख : पुलवामा हल्ल्यातही होती भूमिका

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी आयएसआयचे प्रमुख राहिले आहेत. आता ते जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील. बाजवा 29 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. जनरल मुनीर यांनीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतरच त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सय्यद असीम मुनीर यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतींना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची संयुक्त दल प्रमुखांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असीम मुनीर हे 2018-19 मध्ये 8 महिने आयएसआय प्रमुख होते. इम्रान खान यांनी त्यानंतर आपले निकटवर्तीय फैज हमीद यांना आयएसआय प्रमुख बनवत मुनीर यांची गुजरांवाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली होती. असीम यांना 2018 मध्ये टू-स्टार जनरल पदावर बढती मिळाली होती. परंतु दोन महिन्यांनंतर ते या पदावर रुजू झाले. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ 27 नोव्हेंबरला संपणार आहे.

असीम मुनीर ‘भारतविरोधी’

असीम मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख झाल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल होतील अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यांनी यापूर्वी बऱयाचवेळा भारतविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या कटातही त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. पुलवामा हल्ला हा एक पूर्वनियोजित कट होता आणि तो नियोजन व प्रशिक्षणाद्वारेच अंमलात आणण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून आले होते.

इम्रान खान यांच्या रॅलीकडे लक्ष

नव्या लष्करप्रमुखांवर दबाव आणण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 26 नोव्हेंबरला रॅली काढण्याची घोषणा केली असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, असा अल्टिमेटमही ते सरकारला देणार आहेत. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी (लष्कर) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत तर आपण देशभर आंदोलन छेडू, असे खान यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 26 नोव्हेंबर रोजी होणारी रॅली पाकिस्तानच्या इतिहासात यापूर्वी कधीही झालेली नसेल, असा दावा इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे.

Related Stories

‘या’ लसीपासून अर्धांगवायूचा धोका!

datta jadhav

इंडोनेशियात ज्वालामुखी जागृत

Patil_p

रशियात बाधितांची संख्या 9 लाखासमीप

Patil_p

कोटय़वधींची मालमत्ता, शाही दर्जा नाकारून विवाह

Patil_p

चीन स्टारलिंकपेक्षाही वेगवान सॅटेलाईट नेटवर्क बनविण्याच्या तयारीत

Patil_p

चंद्रावर पोहोचू शकतो पहिला भारतीय

Patil_p