जिल्हा पंचायतवर आयटक-सिटूचा मोर्चा : विविध सुविधा देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यान्ह आहारामध्ये गेल्या 19 वर्षांपासून काम करणाऱया महिलांना 60 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मध्यान्ह आहारामध्ये काम करणाऱया महिलांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आयटक आणि सीटूच्या माध्यमातून जिल्हा पंचायतवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान्ह आहारामध्ये अनेक महिला काम करत आहेत. त्यांना देण्यात येणारे वेतन हे तुटपुंजे आहे. असे असताना अचानकपणे त्यांना कामावरुन कमी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवृत्तीनंतर या सर्व कर्मचाऱयांना पेन्शन द्यावी, याचबरोबर भविष्य निर्वाह निधीही द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना जेवण तयार करून देण्याचे काम त्या करत आहेत. ती एक सेवा आहे. त्यामुळे निवृत्त होताना किमान 1 लाख रुपये तरी आर्थिक मदत संबंधित महिलांना करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जी. एम. जैनेखान, मंदा नेवगी, एल. एस. नायक, तुळसम्मा माळदकर, भारती जोगण्णावर, सुरेश कांबळे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.