संशयित बंदी असलेल्या पीएफआय संघटनेचे कार्यकर्ते
प्रतिनिधी /बेंगळूर
पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. बंदी असून देखील या संघटनेशी संबंधित काही जणांकडून घातपात करण्याचा कट रचण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मंगळूरमध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी ही माहिती दिली आहे.
कारवाईविषयी माहिती देताना ते म्हणाले, संशयित आरोपी कोणाकोणाच्या संपर्कात होते, त्यांनी कोणत्या पद्धतीने घातपातासाठी कट रचला, याविषयी चौकशी केली जात आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. शांततापूर्वक आंदोलन केल्यास कोणताही आक्षेप नाही. मात्र, कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ आहे, असा इशाराही एडीजीपी अलोककुमार यांनी दिला.
पीएफआय संघटनेवर बंदी असून देखील या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे. किनारपट्टी भागातील मंगळूर तसेच शिमोगा, हासन, चिक्कमंगळूर, कोडगू, म्हैसूर, दावणगेरे यासह इतर ठिकाणी कायदा-सुव्यवस्था विभागाकडून माहिती जमा केली जात आहे. मंगळूर जिल्हय़ातील पुत्तूर वगळता अन्य ठिकाणी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे का, याचा छडा लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
भारतातील पीएफआयचे कार्यकर्ते इतर मुस्लीम देशांमधील इस्लामी संघटनांच्या संपर्कात होते. या संघटनेचा देशातील अनेक घातपाती कारवायांमध्ये सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पीएफआयवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशभरात या संघटनेच्या अनेक हस्तकांना आणि समर्थकांना अटक करण्यात आली होती. अटकेत असणाऱया हस्तकांची चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून कारस्थाने बाहेर पडत आहेत.