Tarun Bharat

काश्मीरमध्ये हिंदू बँक मॅनेजरची हत्या

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम येथेगुरुवारी आणखी एका हिंदूची लक्ष्य करुन हत्या करण्यात आली आहे. विजय कुमार असे त्यांचे नाव असून ते बँकेचे व्यवस्थापक होते. बँकेत घुसून दहशतवाद्यांनी त्यांची गोळी घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 1 मे पासूनची ही काश्मीर खोऱयातील हिदूंची आठवी हत्या आहे. 3 दिवसांपूर्वीच कुलगाम येथेच एका पंडित शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती.

विजय कुमार हे मूळचे राजस्थानमधील होते. ते कुलगामच्या मोहनपोरा खेडय़ातील बँक शाखेचे व्यवस्थापक होते. ते बँकेत काम करीत असताना त्यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांचा उपयोग न होता, त्यांचा मृत्यू झाला.

केएफएफने जबाबदारी स्वीकारली

काश्मीर फ्रीडम फायटर्स (केएफएफ) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारत सरकार काश्मीरमधील लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करीत असून येथील मुस्लीमांची लोकसंख्या कमी करुन काश्मीर हिंदूबहुल करण्याचा या सरकारचा कट आहे. जो कोणी या कटाला सहकार्य करेल, त्याची हत्या करण्यात येईल. पंतप्रधान मोदी यांचे सरकार आपल्याला संरक्षण देईल आणि काश्मीरमध्ये स्थिर होण्यास साहाय्य करेल अशी ज्यांची अपेक्षा आहे त्यांनी या हत्यांवरुन धडा घ्यावा, अशी धमकी या संघटनेच्या म्होरक्यांनी दिली आहे.

शाह-डोवाल यांच्यात चर्चा

जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्यात चर्चा झाली आहे. या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाचा कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे सुद्धा समाविष्ट झाले होते. आज 3 जून या दिवशी आणखी एक बैठक होणार असून त्यात जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे उपस्थित राहणार आहेत. काश्मीरमधील पंडित आणि इतर हिंदूंना कशा प्रकारे संरक्षण देता येईल, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पंडित स्थलांतर करणार काश्मीर पंडितांनी मात्र, संरक्षण न मिळाल्यास पुन्हा काश्मीरबाहेर स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. आज 3 जूनपासून हे स्थलांतर करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काही जणांनी गुरुवारीच काश्मीर खोऱयामधून बाहेर जाणे श्रेयस्कर मानले आहे. विविध लोकवस्त्यांमधून काश्मीर खोऱयात आलेल्या पंडितांनी काश्मीर अल्पसंख्य फोरम नावाची संघटना स्थापन केली आहे. या फोरमची एक बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत स्थलांतराचा निर्णय झाला.

Related Stories

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग

Tousif Mujawar

प्रदूषण हटले… हिमालय दिसला

Patil_p

भारतीय हॉकी संघांचे प्रयाण

Patil_p

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

Tousif Mujawar

आनंदाची बातमी; ‘टीईटी’ प्रमाणपत्र वैधता आयुष्यभरासाठी वाढवली

Archana Banage