पुणे / प्रतिनिधी :
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याची शक्मयता नाकारता येत नाही. सन 1999 मध्ये सहा महिने बाकी असताना लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या गेल्या होत्या. त्याच धर्तीवर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराची सांगता शुक्रवारी झाली. चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, प्रकाश गजभिये, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, योगेश बहल उपस्थित होते.
पवार म्हणाले, शिवसेनेचे नाव, चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा, हा त्यांचा अधिकार आहे. पण, सर्वसामान्य जनतेला हा निर्णय मंजूर नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय तडकाफडकी का दिला, याचा विचार करण्याची गरज आहे. ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नाही; तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची, लोकशाहीच्या भविष्याची आहे. त्यामुळे जनतेने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जनता याबाबत निर्णय घेईल. मुस्कटदाबीला राज्यातील जनता चोख उत्तर देईल. विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. याही निवडणुकीकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या. परंतु, कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड-शोच्या निमित्ताने फिरत नव्हते. पण, या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फिरले हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले.
अधिक वाचा : सात जणांच्या हकालपट्टीमुळे 50 मनसैनिकांचे राजीनामास्त्र
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण मांडून आहेत. काही मंत्री गुंडांना घेऊन फिरत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला. मोक्कामध्ये आत राहून आलेल्यांनी भोसले यांच्यावर हल्ला केला. निवडणुकीच्या काळात दहशत माजवू नये, यासाठी पोलिसांनी ज्यांचे रेकॉर्ड खराब आहे, त्यांना नोटीसा का दिल्या नाहीत? भ्याड हल्ले महाराष्ट्रात कधी पाहिले नव्हते. सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला.