त्रिपुरात 16, मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 2 मार्चला होईल, असे स्पष्ट करण्यात आले. तीन राज्यातील पोटनिवडणुकांबरोबरच सहा राज्यांमधील पोटनिवडणुकांची घोषणाही करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या सध्याच्या विधानसभांचा कालावधी येत्या मार्चमध्ये संपणार आहे. त्याआधी तेथे निवडणुका होणार आहेत. सध्या त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. तर नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे राज्य आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पक्षाची सत्ता आहे. ईशान्य भारतातील या एकाच पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे, अशी माहिती देण्यात आली.
त्रिपुरात चुरस होणार
त्रिपुरा या राज्यात विधानसभेच्या 60 जागा असून सध्या त्यांपैकी 7 जागा रिक्त आहेत. 53 पैकी भाजपकडे 33 जागा असून आयपीटीएफकडे 4, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे 15 तर काँगेसकडे 1 अशा जागा आहेत. राज्यात एकंदर 28,13,478 मतदार असून अद्यापपावेतो कोणत्याही प्रमुख पक्षाने या राज्यात अन्य पक्षांशी युती करत असल्याची घोषणा केलेली नाही.
मेघालयात स्थानिकांचे वर्चस्व
मेघालय विधानसभेत एकंदर 60 जागा आहेत. त्यापैकी एनपीपी या स्थानिक पक्षाकडे 20 जागा असून युडीपीकडे 8, पीडीएफकडे 2, भाजपकडे 2, एनसीपीकडे 1, अपक्षांकडे 1 तर 18 जागा रिक्त आहेत. या राज्यात एकंदर मतदारांची संख्या 21 लाखांहून अधिक असून महिलांची संख्या अधिक आहे.
नागालँडमध्ये काय होणार
नागालँड या राज्यात विधानसभेच्या 60 जागा असून सध्या त्यांपैकी 1 जागा रिक्त आहे. एनडीपीपी 41, भाजप 12, एनएफपी 4 आणि अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. एनडीपीपी आणि भाजप या पक्षांनी युती करत असल्याची घोषणा केली आहे. या राज्यात एकंदर मतदारांची संख्या 13,09,651 इतकी आहे.
पोटनिवडणुकांचीही घोषणा
महाराष्ट्रातील कसबा पेठ, चिंचवडचा समावेश
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच सहा राज्यांमधील सात विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. अरुणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 1 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका आहेत. याशिवाय लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील एका जागी लोकसभेची पोटनिवडणूकही होणार आहे. या सर्व जागांसाठी 27 फेब्रुवारीला, म्हणजेच मेघालय आणि नागालँड यांच्या विधानसभांबरोबरच मतदान होणार असून 2 मार्चला मतगणना होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी 31 जानेवारीला अधिसूचना काढण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येतील. 8 फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 27 फेब्रुवारीला मतदानाचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँगेसचे खासदार मोहम्मद फैझल यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे, अशी माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात कसबापेठ मतदारासंघात मुक्ता शैलेश टिळक आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.
तीन राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम
राज्य त्रिपुरा मेघालय-नागालँड
अधिसूचना 21 जानेवारी 31 जानेवारी
अर्जासाठी कालावधी 30 जानेवारी 7 फेब्रुवारी
अर्जांची छाननी 31 जानेवारी 8 फेब्रुवारी
मागे घेण्यासाठी 2 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी
मतदान 16 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी
तिन्ही राज्यातील मतमोजणी 2 मार्च 2023
बॉक्स
वाजल्या निवडणुकांच्या भेरी
ड ईशान्य भारतात आता विधानसभा निवडणुकांचे वातावरण
ड तीन राज्ये छोटी असली तरी ही राष्ट्रीय महत्वाची आहेत
ड दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक मतदान केद्रांवर विशेष व्यवस्था