बस आगार प्रमुखांना ग्रा. पं. समितीचे निवेदनः चापगाव भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल
वार्ताहर /चापगाव
चापगाव भागातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी एकच बस असल्याने खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नसल्याने त्यांचे शालेय नुकसान होत आहे. यासाठी खानापूर ते चापगाव-कोडचवाड या मार्गावर सकाळी आठ ते नऊ या वेळेत आणखी एक बस सोडण्यात यावी, अशी मागणी चापगाव ग्राम पंचायतीच्यावतीने खानापूर बस आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मारुती चोपडे, माजी सभापती सयाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, सिद्धाप्पा कुरबर, पिराजी कुऱहाडे आदी उपस्थित होते.
खानापूर बस आगारातून खानापूर-करंबळ, जळगा, चापगाव ते कोडचवाड तसेच खानापूर-लालवाडीमार्गे चापगाव या मार्गावर दोन बसची मागणी करण्यात आली. सध्या खानापूर बस आगारातून सकाळी 7.30 वाजता सुटणारी बस लालवाडी, चापगाव, कोडचवाडपर्यंत जाऊन त्याच मार्गाने खानापूरला येते. परंतु या बसमधून शेकडो विद्यार्थी व प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे निम्म्याहून अधिक विद्यार्थी बसपासून वंचित राहत आहेत.
या मार्गावर सकाळी 8 या वेळेत आणखी एक जादाची बस सोडण्यात यावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु बस आगाराच्या शेडय़ूलनुसार अतिरिक्त बस याच वेळेत सोडणे शक्मय नसल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले. यासाठी जळगा भागातील प्रवासीवर्गाची मागणी लक्षात घेता या बस आगारातून सकाळी 8 वाजता करंबळ-जळगामार्गे चापगाव ते कोडचवाड अशी आणखी एक बस सोडण्यात यावी, अशी मागणी उपस्थित ग्रामपंचायत समितीने केली.
दुसऱया बसला सोमवारपासून प्रारंभ
कोडचवाड-चापगाव भागातील प्रवासी व विद्यार्थीवर्गाची मागणी लक्षात घेता खानापूर-लालवाडीमार्गे सध्या एक बस धावत आहे. आता करंबळ-जळगा ते चापगावपर्यंत नवीन रस्ता झाल्याने या मार्गावर बसची मागणी आहे. जळगा, कारलगाहट्टी या गावांना आजवर कधीच बस सुविधा करण्यात आली नाही. यासाठी आता जनतेच्या मागणीनुसार खानापूर बस आगारातून सकाळी 8 वाजता सुटणारी बस करंबळ, जळगामार्गे चापगाव ते कोडचवाडला सकाळी 9 वाजता पोहोचेल व त्याच मार्गाने पुन्हा खानापूरला येणारी बस येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले आहे. त्यामुळे चापगाव तसेच जळगा, जळगाहट्टी येथील शालेय विद्यार्थ्यांची व प्रवासीवर्गाची सोय होणार आहे.