वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची आघाडीची थाळीफेक ऍथलिट नवजीत कौर धिल्लाँ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गेल्या जूनमध्ये कझाकस्तान येथे झालेल्या स्पर्धेवेळी तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती.
भारताची महिला ऍथलिट 27 वर्षीय धिल्लाँने 2018 साली गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. पण अलीकडेच झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती आठव्या स्थानावर फेकली गेली होती. 24 जून रोजी कझाकस्तानमध्ये झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या तपासणीमध्ये निर्बंध घातलेले द्रव्य तिच्या या नमुन्यामध्ये आढळून आले. 23 जून रोजी झालेल्या क्युसेनोव्ह स्मृती ऍथलेटिक्स स्पर्धेत नवजीत कौर धिल्लाँने महिलांच्या थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या उत्तेजक विरोधी पथकासमोर तिची या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये तिने आपला गुन्हा मान्य केल्याने तिच्यावर चार वर्षांऐवजी तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.