अज्ञात चोरटय़ांनी लांबविली लाखोंची रोकड, बुधवारी पहाटेची भरवस्तीतील घटना
प्रतिनिधी/ नागठाणे
नागठाणे (ता. सातारा) येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन बुधवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी जिलेटिनच्या साहाय्याने ब्लास्ट करून फोडले. भरवस्तीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. चोरटय़ानी येथून लाखोंची रोकड लंपास केली असून त्याचा आकडा 11 लाख रुपयांच्या आसपास असल्याचा संशय घटनास्थळावरून व्यक्त होत आहे. या धाडसी चोरीत दोघांचा समावेश असून त्यापैकी एक चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागठाणे ते सासपडे जाणाऱया रस्त्यानजीक महामार्गापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर आहे. भरवस्तीत असलेल्या या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटय़ांपैकी एका चोरटय़ाने प्रवेश करून प्रथम सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून बंद केले. त्यानंतर जिलेटीन कांडय़ांच्या साहाय्याने एका मशीनमध्ये स्फोट करून त्यात असलेली संपूर्ण रोकड लंपास करण्यात ते यशस्वी झाले.
अचानक झालेल्या स्फोटाच्या आवाजाने परिसर चांगलाच हादरला गेला. या आवाजाने घाबरलेल्या काही ग्रामस्थांनी घराच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता एटीएम सेंटरमधून धूर येत असल्याचे व बाहेर दोन जणांची संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तुषार सचिन नलवडे यांनी तत्काळ डायल 112 ला फोन करून घटनेची माहिती दिली.
या चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर व कर्मचाऱयांनी धाव घेत तपासाला सुरवात केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे हे पहाटेपासून तळ ठोकून होते. घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रमेश गर्जे व त्यांचे कर्मचाऱयांनी भेट देऊन माहिती घेतली. तपासादरम्यान घटनास्थळावरून बोरगाव पोलिसांनी स्फोट करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून चोरटय़ानी वापरलेले हातमोजे पोलिसांना नागठाणे महामार्गालागत असलेल्या पेट्रोलपंपानजिक सापडले आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक पथक व श्वानपथकानेही भेट दिली. या चोरीची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास सपोनि चेतन मछले करत आहेत.