15 दिवसांमध्ये चौथ्या हिंदू मुलीचे अपहरण ः
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानात तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील अत्याचार थांबण्याची काही चिन्हे नाहीत. सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात एका मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पाकिस्तानात 15 दिवसांमध्ये अशाप्रकारची चौथी घटना घडली आहे. घरी परतणाऱया मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. यापूर्वी हिंदू समुदायाच्या तीन मुलींचे अपहरण करत त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले गेले होते.
हैदराबादच्या फतेह चौक भागातून मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे तिच्या आईवडिलांनी सांगितले आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असली तरीही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. अल्पसंख्याकांच्या विरोधात सातत्याने होणाऱया गुन्हय़ांमध्ये पाकिस्तानातील हिंदूंमध्ये आक्रोश असून भीतीचे वातावरणही आहे. यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी नसरपूर भागातून 14 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तर मीरपूरखास भागात एका अन्य हिंदू मुलीचे अपहरण झाले होते.
एका हिंदू युवकाच्या पत्नीचे अपहरण करत तिचे बळजबरीने धर्मांतर करविण्यात आले होते. तसेच तिचा मुस्लीम युवकासोबत विवाह लावून देण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांवर भेदभावाचा आरोप झाला आहे. सिंध प्रांतातील एका हिंदू युवकाचे बळजबरीने धर्मांतर करविण्यात आल्याचीही घटना घडली आहे.