डोडा येथील वासुकी नाग मंदिरात तोडफोड : संतप्त लोकांकडून निदर्शने
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये डोडा जिल्हय़ातील भदरवाह येथील प्राचीन वासुकी नाग मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भदरवाहला भद्रकाशी असे देखील म्हटले जाते. रविवारी रात्री वासुकी नाग मंदिरात तोडफोड करण्यात आली, सोमवारी सकाळी पुजारी मंदिरात पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली.
पुजाऱयाला मंदिराचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. तसेच मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे वृत्त फैलावताच मंदिराबाहेर मोठी गर्दी जमा झाली. हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने सुरू करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. वासुकी नाग मंदिरात तोडफोडीप्रकरणी पोलिसांचे विशेष पथक सक्रीय झाले आहे.
वासुकी नाग महाराज मंदिर 14,700 फुटांच्या उंचीवर आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये वार्षिक छडी यात्रा पार पडल्यावर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. मंदिरातील तोडफोडीच्या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱया लोकांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी यापूर्वी राहुल भट, शिक्षिका रजनी बाला, बँक व्यवस्थापक विजय कुमार आणि एका हिंदू मजुराची हत्या केली होती. हिंदूधर्मीयांना लक्ष्य केल्यावर दहशतवाद्यांनी आता मंदिरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंच्या टार्गेटेड किलिंगंनतर काश्मिरी पंडितांसह काश्मिरी हिंदूंचे पलायन सुरू झाले आहे. आतापर्यंत 80 टक्के हिंदू काश्मीर खोरे सोडून जम्मूत स्थलांतरित झाले आहेत. पंतप्रधान पॅकेज आणि अनुसूचित जातीसाठीच्या राखीव जागांतर्गत काश्मीर खोऱयात सुमारे 5,900 हिंदू कर्मचारी आहेत.