वृत्तसंस्था/ कोलकाता
बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीवर शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण कोलकाता येथील सदर्न एव्हेन्यू येथे दुचाकीस्वार हल्लेखोराने हल्ला केला. यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कारची खिडकी तुटलेली दिसत आहे. तसेच पायल मुखर्जी आपल्यासोबत घडलेल्या एका भीषण घटनेची तक्रार करत असताना दिसत आहे. कोलकाता येथील बलात्कार-हत्येची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह गृह खात्याला धारेवर धरले आहे. भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रडतानाही दिसत आहे.