सुदीप रॉय बर्मन जखमी ः काँग्रेसकडून भाजपवर आरोप
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुरामध्ये 23 जून रोजी होणाऱया पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविणारे सुदीप रॉय बर्मन यांच्यावर रविवारी रात्री हल्ला झाला असून यात ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसने हा हल्ला भाजपने करविला असल्याचा आरोप केला आहे.
अगरतळा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे सुदीप रॉय बर्मन हे प्रचार मोहिमेयच अंतर्गत एका समर्थकाला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. पोलिसांनुसार संशयितांनी बर्मन यांच्यावर हल्ला केल्यावर त्यांच्या कारची तोडफोड केली आहे.
बर्मन यांनी चालू वर्षाच्या प्रारंभी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बर्मन हे यापूर्वी राज्य सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. परंतु त्यांना पक्षविरोधी कारवायांप्रकरणी मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. 1998 पासून ते राज्याच्या राजधानीचे आमदार राहिले आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी एक सुरक्षारक्षक आणि बर्मन यांच्या वाहनचालकावर 2 मे रोजी काही अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. त्रिपुरातील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 23 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 26 जून रोजी होणार आहे.