युवक गंभीर जखमी : पाच जणांना अटक : अल्पवयीन मुलाचाही समावेश
प्रतिनिधी/इचलकरंजी
कोरोची येथे पूर्व वैमनस्यातून चौघांवर कोयता व विळाने वार झाल्याची घटना घडली. सुनिता माने, विकी माने, अशोक माने व संजय माने अशी जखमींची नावे आहेत. यापैकी विकी माने हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये शुभम माने, रमेश माने, प्रथमेश माने, रितेश माने, योगेश उर्फ योगीराज माने व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी सुनीता माने व संशयित आरोपी हे एकाच गल्लीत राहण्यात आहेत. सुनेची छेड काढल्याच्या कारणावरून यापूर्वी सुनीता माने व शुभम माने यांच्यात वाद झाला होता. शनिवारी रात्री विकी हा घरासमोर थांबला असता संशयितांनी विकी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने शुभम याने विळ्याने विकीच्या डोक्यात व पोटावर वार केले. रमेश यानेही कोयत्याने वार केले. यावेळी सुनीता या अडवण्यासाठी आले असता बबलू व अल्पवयीन मुलाने सुनीता यांच्या हातावर व तोंडावर विळ्याने वार करून जखमी केले.
हे ही वाचा : शहरात विक्रीसाठी आणलेला ७ किलो गांजा जप्त
दरम्यान, अशोक माने व शेजारी राहणारे संजय माने हे भांडण सोडवण्यासाठी आले असता रितेश व योगीराज यांनी अशोक यांच्या डोक्यात तर संजय यांच्या हातावर वार करून जखमी केले असे तक्रारीत म्हटले आहे. जखमींवर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिकायांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कोरोची येथील गावभाग परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सुनीता अशोक माने (वय 52, रा. कोरोची) यांनी दिली आहे. ही घटना रोहिदास मंदिर मागे गावभाग येथे शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.