ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबच्या मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या इमारतीवर सोमवारी रात्री रॉकेटसदृश्य हल्ला झाला. (Rocket-type attack on Intelligence Bureau building in Mohali, punjab) स्फोटामुळे इमातीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मोहालीतील सोहाना येथील इंटेलिजन्स ब्युरोच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री 7.45 च्या सुमारास एक रॉकेटसदृश्य वस्तू येऊन आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचा परिसर हादरला. या स्फोटात इमारतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासानुसार हा हल्ला RPG द्वारे म्हणजेच रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने केल्याचे समोर आले आहे.
एसपी रविंदर पाल सिंह यांनी सांगितलं की, इंटेलिजन्स ब्युरोच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्याची तीव्रता कमी होती. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीच्या काचा फुटून काही प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर मोहालीत आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा हल्ला म्हणजे दहशतवादी कट असण्याची शक्यता आहे. पंजाब पोलीस आणि एफएसएल टीमचे वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत.