ऑनलाईन टीम / नगर :
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (rahul rajale) यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला शेवगाव बस स्थानकावरून पोलिसांनी अटक केली आहे. नितीन शिरसाठ असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून, त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
नगर जिल्ह्यातील घोडेगावजवळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता. राजळे यांच्यावर तीन फायर करुन हल्लेखोर फरार झाले होते. राजळे यांच्या मांडीला गोळी लागली असून, ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नगरच्या मॅक्सकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राहुल राजळे यांच्यावर झालेला हल्ला हा आपल्यावरच झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली होती. त्यानंतर एक ऑडिओ क्लीपही समोर आली होती. त्यामध्ये शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांना जीवे मारण्याचा संवाद आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, गडाख आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्यासाठी 20 विदेशी पिस्तूल खरेदी करण्यात आल्याचेही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, राजळेंवरील हल्ल्याचा आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा संबध आहे का? याबाबतचा तपास सुरू केला. तसेच गडाख आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवली आहे.