पाटण्यातील घटना ः पोलीस अधीक्षकांसह अनेक जखमी
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिसांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले असून पोलीस अधीक्षक अमरीश राहुल यांचाही यात समावेश आहे. शहरातील राजीव नगरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस पोहोचले हेते. हल्ल्यानंतर 2 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक लोकांच्या विरोधानंतरही अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच राहिली.
लोकांनी स्वतःच्या घरांच्या छतावरून पोलिसांवर दगडफेक केली होती. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराचा वापर करावा लागला. संबंधित परिसरात तणावपूर्ण स्थिती असल्याने बंदोबस्त वाढवावा लागला. कारवाई सुरूच राहणार आहे. कुठल्याही स्थितीत शासकीय भूमीवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे अन्य आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी काढले आहेत.