पुणे / वार्ताहर :
भाई न म्हटल्याच्या रागातून टोळक्याने तरूणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सराईतासह तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.
संतोष पंडीत साळवे (वय 36, रा. यशवंतनगर, येरवडा, पुणे) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ कान्या सोनवणे (वय 30 रा. नवी खडकी, पुणे), संकेत मारे उर्फ मेडय़ा, सोनू मारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश सुरेश पवार पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक वाचा : प्रसंगी डबल मत देण्याचा सरपंचांना अधिकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चार जानेवारीला रात्री सव्वा आठच्या सुमारास व्यायाम शाळेतून घरी निघाले होते. त्यावेळी ओळखीतील प्रफुल्ल भेटला. संतोषने त्याला काय पप्या काय चालले आहे, असे विचारले. त्याचा राग आल्यामुळे आरोपी संकेतने काय तुला माज आला आहे का, तुला भाई बोलता येत नाही का, लय मोठा भाई झाला का? असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर आरोपी संकेतने संतोषच्या डोक्यात रॉडने जबर मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेवेळी आजूबाजूचे लोक भांडण सोडविण्यासाठी गेले असता, टोळक्याने रॉड हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करीत आहेत.