बेळगाव शहर, ग्रामीण-खानापूरमधील प्रकार : शिक्षक संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात सीआरपी पदांसाठी कौन्सिलिंग सुरू आहे. यामध्ये मराठी शिक्षकांना डावलून कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जात आहे. मराठी शाळांवर कन्नड शिक्षक थोपविले जाणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयाबद्दल मराठी शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक संघाने यासंदर्भात
जिल्हाशिक्षणाधिकाऱयांना निवेदन देऊन मराठी शिक्षकांचीच निवड करण्याची मागणी केली आहे.
बेळगाव शहरात फुलबाग गल्ली, चव्हाट गल्ली या दोन सीआरपी पदासाठीच्या जागा रिक्त होत्या. ग्रामीणसह खानापूरमध्येही काही जागा रिक्त होत्या. शिक्षण विभागाने सीआरपी पदासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा घेतली होती. त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे सीआरपी पदासाठी कौन्सिलिंग सुरू आहे. कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना अधिक गुण मिळाले असल्याने त्यांच्याच नेमणुका केल्या जात आहेत. वास्तविक मराठी माध्यमांच्या शाळांना मराठी सीआरपी असणे आवश्यक आहे.
आधीच शिक्षण विभागात सर्वत्र कानडीकरण करण्यात आले आहे. त्यातच आता सीआरपी पदेही कन्नड शिक्षकांमार्फत भरून घेतली जात आहेत. शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक संघटनेच्यावतीनेही जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देऊन मराठी शिक्षकांचीच नेमणूक करण्याची मागणी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता जिल्हाशिक्षणाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, ते पहावे लागणार आहे.
आज म. ए. युवा समिती देणार निवेदन
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने सीआरपी निवडीबद्दल मराठी शिक्षकांवर अन्याय होत असल्याबद्दल जिल्हाशिक्षणाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार आहे. गुरुवार दि. 28 रोजी सकाळी 11 वा. क्लब रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.