ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेदरम्यान व्हीव्हीआयपी झोनमध्ये घुसखोरी करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एनएसजीचे बनावट ओळखपत्र दाखवून ही व्यक्ती व्हीव्हीआयपी झोनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यावर संशय आल्याने 30 मिनिटे पाठपुरावा करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. रामेश्वर मिश्रा असे त्याचे त्या व्यक्तीचे नाव आहे.
पंतप्रधान मोदी यांची 19 फेब्रुवारीला बीकेसी मैदानावर सभा पार पडली. या सभेपूर्वी रामेश्वर मिश्रा हा एनएसजीचे बनावट ओळखपत्र दाखवून सभेच्या व्हीव्हीआयपी झोनमध्ये घुसखोरी करत होता. पण मुंबई पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो भारतीय लष्कराच्या गार्ड्स रेजिमेंटचा सैनिक असल्याचा दावा करत आहे. पण पोलिसांनी त्याच्या ओळखपत्राची तपासणी केली असता त्याची छेडछाड करून ते बनवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला वांदे न्यायालयात हजर केले असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, मिश्रा व्हीव्हीआयपी झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न का करत होता, याची आर्मी, आयबी, दिल्ली पोलीस आणि पीएम सुरक्षा अधिकाऱयांकडून चौकशी सुरू आहे.